ठाणे : ठाणे महापालिका हद्दीत थीम पार्क आणि बॉलिवूड पार्क प्रकरण ताजे असताना आता पालिकेने घोडबंदर भागात आरक्षित भूखंडावर बायो जिओग्राफी व नॉलेज पार्क उभारण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. यासाठी चार कोटी ९३ लाख ३५ हजार ५१७ रुपयांचा खर्च केला जाणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव येत्या २० फेब्रुवारीच्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे.
महापालिकेत यापूर्वी थीम पार्क आणि बॉलिवूड पार्कचे प्रकरण चांगलेच गाजले होते. थीम पार्कचे काम पूर्ण झालेले आहे. मात्र, अर्धवट असलेल्या बॉलिवूड पार्कच्या कामाचे पैसेही ठेकेदाराला अदा केले आहेत. त्यामुळे हे काम बंद करण्याची मागणी महासभेत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी लावून धरली होती. ही दोन्ही प्रकरणे आजही ताजी असताना पालिकेने घोडबंदर भागातील वाघबीळ येथे हिल स्प्रिंग इमारतीसमोरील उद्यानाच्या आरक्षित भूखंडावर हे बायो जिओग्राफी व नॉलेज पार्क उभारण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.या असणार सुविधा या प्रस्तावानुसार या ठिकाणी नॉलेज पार्क, प्लॅनेट झोन, सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी झोन, लाफिंग झोन (अंब्रेला), चेस झोन, क्विझ झोन, स्पीकर कॉर्नर, योगा एरिया, वॉटर फाउंटन, नो युवर मदरलॅण्ड, स्टोरी रीडिंग एरिया, बर्ड्स अॅण्ड अॅनिमल झोन, अॅक्युप्रेशर वॉकिंग ट्रॅक, सोलर पार्क, सेवन वंडर्स आॅफ द वर्ल्ड, चिल्ड्रन प्ले झोन, रेन्बो गार्डन, नॉलेज प्लॅटफॉर्म, स्पोर्ट्स अॅण्ड जिम इक्विपमेंट, शौचालय, पाणपोई, सेवा कक्ष, फूड काउंटर, पाथ वे, सिंचनव्यवस्था, प्रवेशद्वार, लॅण्डस्केप, संरक्षक भिंत, कमानी, फर्निचर व इतर कामांचा यात समावेश असणार आहे. या ठिकाणी येणाऱ्या नागरिक व लहान मुलांना याचा फायदा होणार असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. या कामासाठी चार कोटी ९३ लाख ३५ हजार ५१७ रुपये खर्च केला जाणार आहे.निगा-देखभाल कोण करणारयापूर्वीदेखील अनेक छोटीमोठी उद्याने पालिकेने विकसित केली आहेत. त्यावर लाखोंचा किंवा कोट्यवधींचा खर्च करूनही त्यांची अवस्था काय झाली, हे पालिकेला नव्याने सांगायची गरज नाही. निगा-देखभाल कोण करणार, हा यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे हे उद्यान तरी व्यवस्थित राहील का, हा सवाल यानिमित्ताने करण्यात येत आहे.