कल्याण : कारखान्यांमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी विकसित केलेल्या बायोनेस्ट या नव्या तंत्रज्ञानाची दुसरी चाचणी डोंबिवलीत कल्याण-अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनतर्फे (कामा) घेण्यात आली. या बायोनेस्टमुळे प्रदूषण कमी होऊन पाण्याचा पुनर्वापर करता येणार आहे.
डोंबिवलीत औद्योगिक रासायनिक सांडपाणी प्रदूषणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून गाजत आहे. यापूर्वी डोंबिवलीत प्रदूषणामुळे हिरवा पाऊस, रस्ता गुलाबी होण्याचे प्रकार घडलेले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही त्याची दखल घेतली आहे. प्रदूषण रोखण्यासाठी येणाऱ्या नव्या नियमावलीमुळे कंपनी चालविणे कठीण होते. त्यावर कंपनीचालकांनी बायोनेस्टचा तोडगा शोधला आहे. त्याची माहिती देण्यासाठी ‘कामा’ने गुरुवारी बायोनेस्टची दुसरी चाचणी घेतली.
औरंगाबादच्या यश एंटरप्रायझेसने हे तंत्रज्ञान विकसित केले असून, कल्याण-डोंबिवलीत त्याचा वापर प्रथमच होत आहे. यश एंटरप्रायझेसने त्याचे मॉडेल चाचणीसाठी दिले आहे. त्यामुळे कोणताही खर्च आला नाही. ‘कामा’कडून आता १० हजार लीटरचा प्रयोग केला जाणार आहे. त्यासाठी १५ ते २० लाखांचा खर्च आहे. सर्व उद्योजकांच्या बायोनेस्टची एकत्रित मागणी करणार आहे. त्यामुळे उद्योजकांना जरा स्वस्तात पडेल, अशी माहिती अध्यक्ष देवेंद्र सोनी यांनी दिली.
श्री यश फाउंडेशनचे यश पटेल म्हणाले, या प्रक्रियेतून बाहेर आलेले पाणी सफाईसाठी, फ्लशिंग, झाडांसाठी वापरता येईल. ८० टक्के पाणी रिक्वहरी होते. या तंत्रज्ञानाला देखभाल दुरुस्ती लागत नाही. गुरुत्वाकर्षणावर ही सिस्टीम चालते. औरंगाबाद, गुजरात येथे २० ते २५ कारखान्यांत त्यांचा वापर केला जात आहे.
काय आहे बायोनेस्ट तंत्रज्ञान
बायोनेस्ट तंत्रज्ञानात बॅक्टेरिया रसायने खातात. त्यात सांडपाणी प्रक्रिया होऊन बाहेर येते. त्याचा वापर कंपनीचालकांनी केल्यास प्रदूषणाची समस्या सुटू शकते. त्याचबरोबर पाण्याचा पुनर्वापर केला जातो. त्याला विजेची आवश्यकता नाही. या तंत्रज्ञानात एकदाच गुंतवणूक करावी लागते. बॅक्टेरिया रसायने खाऊन पाणी पुढे ढकलतात. त्या पाण्यावर झाडे जगतात. त्यातून कार्बन डायऑक्साइड निघतो त्यात बॅक्टेरिया गुणाकार पद्धतीने वाढतात.
-----