राज चिंचणकर ।मुंबई : आज ज्यांनी वयाची चाळिशी ओलांडली आहे, त्यांचे बालपण काऊ-चिऊच्या गोष्टींनी व्यापले होते. आजीच्या तोंडून या गोष्टी ऐकताना ही पिढी आपोआप समृद्ध होत गेली. पण काळाच्या ओघात या गोष्टी मागे पडल्या आणि त्यांची जागा आधुनिक ‘गेम्स’नी घेतली. मात्र ज्येष्ठ साहित्यिका नीलिमा भावे यांनी परंपरा आणि बालसंस्कृतीची जोपासना करत केवळ काऊ-चिऊच नव्हे; तर समग्र ‘पक्षी’मंडळाची सैर कवितेच्या माध्यमातून बच्चेमंडळींना घडवून आणली आहे.काव्य आणि चालींतून मिळालेले शिक्षण मुलांच्या मनावर अधिक ठसते, हे सूत्र पक्के करत त्यांनी या गोष्टी कवितेच्या माध्यमातून सादर केल्या आहेत. यातून विविध जातींच्या पक्ष्यांची तोंडओळख त्यांनी घडवली आहे. सहज दृष्टीस पडणारे कावळा, चिमणी, कबुतर असे पक्षी मुलांना परिचित असतात. परंतु बुलबुल, कोकीळ, पारवा, सुतार, भारद्वाज, कोतवाल असे पक्षी मुलांच्या हातून सहज सुटून गेलेले असतात. त्यांचीच मोट नीलिमा भावे यांनी बांधली आहे. या पक्षीनिरीक्षणासह बालशिबिरांच्या अनुभवांची भेटही त्यांनी दिली आहे.
कवितेतून घडणार ‘पक्षी’ मंडळाची सैर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2017 1:46 AM