अनिकेत घमंडीडोंबिवली : एमआयडीसी मिलापनगर मध्ये पक्षांचे अस्तित्व वाढू लागल्याचे दिसू लागले आहे. फार कमी प्रमाणात दिसणारे पोपट, साळुंक्या, चिमण्या, भारद्वाज, लवबर्ड सारखे दिसणारे इत्यादी अनेक प्रकारचे पक्षी सद्या दिसू लागले आहेत. त्याला प्रदूषण कमी झाले हे कारण जरी असले तरी येथील असलेले मोठे वृक्ष, स्वतःच्या बंगल्या भोवताली लावलेली फळाफुलांची झाडे, पाणी पिण्यासाठी मिलापनगर तलाव, परिसरातील शांतता इत्यादींमुळे विविध पक्षी येथे येत असतात. त्यात येथील काही हौशी रहिवाशी आपल्या बंगल्याच्या खिडकी, गॅलरी मध्ये त्यांच्या खाद्य व पाण्याची व्यवस्था करीत असतात.
मिलापनगर मधील रहिवासी असलेले आर्किटेक्ट विवेक परांजपे यानी आपल्या बंगल्याच्या खिडकीत पक्षांना खाद्य पुरवण्यासाठी बर्ड फिडर ही वस्तू काही दिवसांपूर्वी लावली होती. त्यात ते रोज तांदळाची कणी टाकतात. ते खाण्यासाठी पोपट पक्षांचा झुंडी रोज सकाळी तसेच दिवसभर येत असतात. पोपट बरोबर चिमण्या, खारी हे पण येत असतात. जर एखाद्या दिवशी बर्ड फिडर मध्ये खाद्यपदार्थ टाकण्यास विसरले गेले तर पहाटे पोपट येऊन त्यांचा प्रेमळ आवाजात ओरडून इशारा देत राहतात. साधारण रोज अर्धा ते पाऊण किलो तांदळाची कणी विवेक परांजपे यांचाकडून त्यात टाकली जाते. सदर हे बर्ड फिडर त्यांनी जीवदया या NGO संस्थेकडून घेतले आहे. त्यांनी अनेकजणांना भेट म्हणून बर्ड फिडर दिली आहेत. ज्यांना बर्ड फिडर पाहिजे असेल त्यांनी जीवदया तसेच अँमेझोन इत्यादी साईडवर जाऊन ऑनलाइन मागू शकतात.
आर्किटेक्ट विवेक परांजपे यांचे याबद्दल खास अभिनंदन ! माझ्या घरातील टेरेस गॅलरी समोरील झाडांवर साळुंक्या या पक्षांच्या झुंडी सकाळी येऊन आवाज करीत असतात. त्याचाबरोबर खारी पण येतात. त्यांना लागणारे खाद्य व पाणी टेरेस वरील झाडांच्या कुंड्यांमध्ये ठेवले जाते. त्यांच्या विशिष्ट आवाजामुळे सद्याच्या लॉकडाऊन काळात मनाला प्रसन्नता, शांती देऊन जात असल्याचा अनुभव रहिवासी राजू नलावडे यांनी लोकमतजवळ व्यक्त केला