वाढदिवसाच्या दिवसाचं हटके सेलिब्रेशन करण्याचं जीवघेण खुळ अनेकांना लागलेले असते. सोशल मीडियात आपण अनेक व्हिडीओ पाहिले असतील ज्यात बर्थ डे सेलिब्रेशन करण्यासाठी तरूणाई काय काय करते. मात्र एखाद्याची मस्ती कुणाच्या जीवावर बेतणार असेल तर त्याचा काय आनंद? सध्या सोशल मीडियावर फिरणाऱ्या एका घटनेने सगळ्यांना विचार करण्यास भाग पडेल.
जराशीही मस्ती एखाद्यासाठी जीवघेणी ठरू शकते हे अंबरनाथ येथे घडलेल्या एका घटनेवरून सगळ्यांना कळेल. याठिकाणी बर्थडे सेलिब्रेशन करण्यासाठी जमलेल्या तरुणांच्या जमावाने मित्राच्या वाढदिवशी जो कारनामा केला त्यामुळे बर्थ डे बॉयला थेट हॉस्पिटलला घेऊन जावं लागलं. बर्थ डे सेलिब्रेशनवेळी एका आगीच्या ठिणगीने आग भडकल्याची दुर्दैवी घटना घडली. त्यात एक युवक पूर्णपणे जळाला. मंगळवारी घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये विघ्न आल्यानंतर आता राहुल नावाचा युवक हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. बुवापाडा परिसरात राहणाऱ्या राहुलचा मंगळवारी वाढदिवस होता. वाढदिवसाला खास बनवण्यासाठी मित्रांनी सर्व तयारी केली होती. वाढदिवसाला हटके बनवण्यासाठी सोबत अंडी आणि पीठ देखील आणलं होतं. राहुलला वाढदिवसाची टोपी घालून राजाचा मुकुट घातला गेला.
एक छोटीशी चूक ठरली जीवघेणी
यानंतर राहुलने केक कापताच त्याच्या मित्रांनी जळती मेणबत्ती तोंडाजवळ धरली. यानंतर, आधी अंडी डोक्यावर फेकली गेली आणि नंतर एकाने पीठ ओतले. त्यामुळे तोंडाजवळ असलेल्या मेणबत्तीतून बाहेर पडलेल्या ठिणगीने राहुलला आगीच्या भक्ष्यस्थानी अडकवले. आजूबाजूच्या लोकांना काही समजेपर्यंत राहुल अर्ध्याहून अधिक भाजला होता. लोकांनी कशीतरी आग विझवली आणि राहुलला रुग्णालयात नेले.
राहुलच्या जखमा बऱ्या व्हायला वेळ लागेल
पीठ ज्वलनशील आहे आणि चमचमत्या मेणबत्तीतून निघणाऱ्या ठिणगीमुळे ते जळते. राहुलवर पीठ ओतणाऱ्यांनीच त्याला हॉस्पिटलमध्ये नेले. या आगीमुळे राहुलचा जीव वाचेल, पण त्याच्या शरीरावरील जखमा भरून येण्यास वेळ लागेल, असे डॉक्टरांनी सांगितले.