मीरा रोड : मीरा भाईंदर महापालिकेच्या मीरारोड येथील महापालिकेच्या इमारतीत भाजपच्या नगरसेविका व कार्यकर्त्यांनी एका स्थानिक नेत्याचा वाढदिवस साजरा केल्याचा व्हिडिओ व छायाचित्रे रविवारी व्हायरल झाली आहेत.
भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांचा वाढदिवस असल्याने त्यांच्या समर्थकांनी वाढदिवस साजरा करण्यासाठी ठिकठिकाणी विविध कार्यक्रम चालवले होते. मीरा रोडच्या प्रभाग १८ मधील नगरसेविका विविता नाईक व भाजपच्या महिला कार्यकर्त्या रितू चतुर्वेदी, बिंदू उपाध्याय, भारती सोमवंशी आदींनी पूनम गार्डन परिसरात असलेल्या महापालिका इमारतीत ज्येष्ठ नागरिकांच्या विरंगुळा केंद्रातच शुक्रवारी रात्री मेहतांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम साजरा केला.
इमारतीच्या तळमजल्यावर ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र तर, पहिल्या मजल्यावर विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका आहे. सदर इमारत महापालिकेची असताना नाईकसह भाजप कार्यकर्त्यांनी परवानगी न घेताच कार्यक्रम केल्याचे व्हायरल व्हिडिओ व छायाचित्रांवरून उघडकीस आले. भाजप नगरसेविका व कार्यकर्त्यांनी यावेळी मास्क देखील घातलेले नव्हते.