ठाणे : शहरातील नाल्यांची सफाई ही ७० टक्के झाल्याचा दावा सत्ताधारी शिवसेनेने केला असतांनाच शहरातील नाल्यांची सफाई नाही तर हात की सफाई झाली असल्याचा दावा मंगळवारी शहर भाजपच्या वतीने करण्यात आला आहे. भाजपच्या वतीने शहरातील वागळे इस्टेट, घोडबंदर, श्रीरंग सोसायटी, राबोडी आदी भागातील नाल्यांची पाहणी करण्यात आली. परंतु सत्ताधारी शिवसेनेकडून नालेसफाईचा जो दावा करण्यात आला आहे तो खोटा असून केवळ ठाणेकरांच्या डोळ्यात धुळफेक करण्याचाच हा प्रकार असल्याचा आरोप भाजपचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष निरंजन डावखरे आणि आमदार संजय केळकर यांनी केला आहे.सोमवारी महापौर नरेश म्हस्के यांनी वागळे इस्टेट, नौपाडा आदी भागातील नाले सफाईच्या कामांचा पाहणी दौरा केला होता. त्यावेळेस त्यांनी नालेसफाईची कामे समाधानकारक झाली असल्याचे सांगत ७० टक्क्यार्पयत नालेसफाईची कामे पूर्ण झाली असून उर्वरीत कामे मे अखेर र्पयत पूर्ण करण्याचे आदेश दिल्याचेही सांगितले होते. त्यानंतर अवघ्या एका दिवसातच भाजपच्या वतीने देखील शहरातील नालेसफाईचा पाहणी दौरा केला आहे. यामध्ये त्यांनी वागळे इस्टेट, घोडबंदर, श्रीरंग सोसायटी, राबोडी आणि चक्क महापौरांच्या वॉर्डातील म्हणजेच कोपरीतील नाले सफाईच्या कामांची पाहणी केली. या पाहणीत नाले सफाईची कामे कोणत्याही प्रकारे समाधानकारक झाली नसल्याचा सांगत त्यांनी महापौरांनी नालेसफाईचा केलेला दावा फोल ठरविला आहे.
वागळेसह शहरातील इतर भागातील नाले सफाईची कामे ही केवळ दिखावा असून नाले अजूनही साफ केले गेलेले नाहीत. महापालिकेकडून चुकीच्या पध्दतीने माहिती दिली जात असून ठाणोकरांसमोर फसवे चित्र उभे केले जात असल्याचा आरोप यावेळी निरंजन डावखरे यांनी केला आहे.ही नालेसफाई नसून ही सत्ताधारी शिवसेनेची हात की सफाई आहे, वर्षानुवर्षे ठाणोकरांच्या डोळ्यात धुळ फेक करण्याचे काम केले जात असून दरवर्षी कोटय़ावधींचा खर्च हा पाण्यात घालण्याचे काम सत्ताधा:यांकडून केले जात आहे. काम हात नाही, परंतु बिले काढली जात असल्याचा आरोप आमदार संजय केळकर यांनी केला आहे.