कल्याण : माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांनी २००४ मध्ये निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी चांगली कामे केली होती. त्यामुळे ते निवडून येतीलच, असा विचार भाजपाला पाठिंबा देणाऱ्या बुद्धीजीवी मंडळींनी केला. वाजपेयी यांना मतदान करायला आम्ही गेलो नाही तरी मतदार त्यांना मते देतील, अशा भ्रमात बुद्धिजीवी लोक राहिले. त्याचा परिणाम काय झाला हे सगळ््यांनाच माहिती आहे. त्याची पुनरावृत्ती २०१९ सालच्या निवडणूकीत होऊ नये, याकरिता बुद्धिजीवी वर्गाने मतदान करावे, असे आवाहन रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी मंगळवारी केले.बुद्धिजीवी वर्ग विविध विषयावर चर्चा खूप करतो. मात्र, प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मतदान करीत नाही. त्याचा फटका भाजपाला बसू शकतो, असे सिन्हा म्हणाले. कल्याणच्या पश्चिमेतील मंगेशी सभागृहात भाजपाच्या वतीने ‘बुद्धिजीवी संमेलना’चे आयोजन भाजपाचे आ. नरेंद्र पवार यांनी केले होते. त्यावेळी सिन्हा बोलत होते. या प्रसंगी भाजपाचे खा. कपिल पाटील, नेते जगन्नाथ पाटील, डॉ. शुभा पाध्ये आदी मान्यवर उपस्थित होते.सिन्हा म्हणाले की, बुद्धिजीवी वर्गाने मतदान केले तर २०१९ सालच्या निवडणुकीत ३०० पेक्षा जास्त जागा भाजपाला मिळणार आहेत. मात्र त्याकरिता भाजपाच्या प्रत्येक मतदाराने मतदान करणे आवश्यक आहे. आपण मत दिले नाही तरी मोदी निवडून येतील या भ्रमात कुणीही राहू नये याकडे सिन्हा यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.>फक्त अडीच लाख द्यायचे राहिलेराज्यमंत्री सिन्हा म्हणाले की, नरेंद्र मोदी मागील निवडणुकीपूर्वी म्हणाले होते की, परदेशातील काळा पैसा भारतात आणून त्याचा विनियोग विकास कामांसाठी करणार आहे. मोदीने सांगितल्याप्रमाणे प्रत्येक भारतीयाच्या खात्यात १५ लाखांतील १२ लाख ५० हजार रुपये विविध सबसिडी व योजनांच्या माध्यमातून यापूर्वी जमा केले आहेत.उर्वरित २ लाख ५० हजार रुपये अन्य योजनाच्या माध्यमातून द्यायचे बाकी आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी यापूर्वी हे १५ लाख हा चुनावी जुमला असल्याचे म्हटले होते तर केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी ‘अच्छे दिन’ ही ‘गले की हड्डी’ असल्याचे म्हटले होते.
बुद्धिजीवी मतदानाकडे पाठ फिरवण्याची भाजपाला भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2019 12:46 AM