उल्हासनगर : भाजपाच्या कोअर कमिटीने ओमी कलानी आणि त्यांच्या टीमच्या प्रवेशाला विरोध सुरूच ठेवलेला असताना प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या आशीर्वादाने भाजपातील एका गटाने पुन्हा ओमी कलानी यांची भेट घेऊन चर्चा केल्याने खळबळ उडाली. पक्षाचे नेते कुमार आयलानी यांच्या सांगण्यावरून ही भेट झाल्याचा दावा या नेत्यांनी केल्याने आयलानी यांनी लगोलग खुलासा करत आपला विरोध कायम असल्याचे सांगितले. आमदार ज्योती कलानी यांनी याबाबत काहीही माहित नसल्याचे सांगून अधिक बोलण्यास नकार दिला. ओमी यांचा मोबाईल दिवसभर बंद होता. ओमी टीमच्या सदस्यांनी मात्र अशी भेट झाल्याला दुजोरा देत भाजपा प्रवेशासाठीच चर्चा झाल्याचे स्पष्ट केल्याने उल्हासनगरचे राजकारण नव्याने ढवळून निघाले आहे. उल्हासनगर महापालिका निवडणुकीच्या दंगलीत भाजपाचे माजी शहरजिल्हाध्यक्ष व कोअर कमिटीचे सदस्य लाल पंजाबी, जमनुदास पुरस्वानी, डॉ. प्रकाश नाथानी, राम चार्ली, प्रकाश मखिजा यांनी कलानी बंगल्यावर जावून भाजपा-ओमी टीमच्या एकत्र येण्याबाबत चर्चा केली. ओमी टीम भाजपात आल्यास नेमके काय परिणाम होतील. शिवसेनेशी संबंध, राष्ट्रवादीतील विरोध यावर यावेळी चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. उल्हासनगर भाजपातील एका गटाचा ओमी यांना टोकाचा विरोध आहे, तर दुसऱ्या गटाचा पाठिंबा आहे. ओमी यांच्याशी सहकार्य न केल्यास पक्षातून फुटून ओमी गटाला मिळण्याइतका हा टोकाचा पाठिंबा आहे. या गटाला प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा पाठिंबा असल्याचे बोलले जाते. त्यांच्यामुळेच या गटातील व्यक्तींना कोअर कमिटीत सामावून घेण्यात आले. पक्षात फूट पडू नये, म्हणून मुख्यमंत्र्यानी ओमी यांचा प्रवेश लांबविल्याचे बोलले जाते. तो निवडणुकीच्या तोंडावर होईल, असा या गटाचा दावा आहे. दरम्यान, ओमी यांचे सहकारी मनोज लासी यांनी या भेटीला दुजोरा दिला आणि भाजपा प्रवेशासाठीच भेट झाल्याचे मान्य केले. (प्रतिनिधी)
ओमी टीमसाठी पुन्हा भाजपाचा गळ
By admin | Published: January 05, 2017 5:47 AM