ठाणे : कोरोनामुळे महापालिकेच्या उत्पन्नावर जसा परिणाम झाला तसाच शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, विधवा आदींसह इतर व्याधी असलेल्या महिलांनादेखील घराचा गाडा आखताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे महापालिकेच्या समाज कल्याण विभागाच्या योजनांचा या महिलांना फायदा मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, या निधीला महापालिकेने कात्री लावून महापौरांसह पदाधिकाऱ्यांच्या नवीन वाहने खरेदीसाठी ७० लाखांचा चुराडा करण्यासाठी निधी कसा मिळाला, असा सवाल भाजपच्या महिला अध्यक्षा मृणाल पेंडसेंसह माजी गटनेते संजय वाघुले यांनी केला आहे. जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा, असा टोलाही त्यांनी शिवसेनेला लगावला आहे.
मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोनाची साथ सुरू झाली. ती रोखण्यासाठी लॉकडाऊन घेतल्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नावरदेखील याचा परिणाम होऊन उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसविताना प्रशासनाची दमछाक होत आहे. परंतु, असे असताना ५-२-२ खाली गाड्या खरेदीची घाई मात्र सुरू आहे. अत्यावश्यक असलेल्या कामांचा ५-२-२ खाली समावेश केला जातो. मात्र वाहन खरेदी अत्यावश्यक कामात कशी मोडते, असा सवालही त्यांनी केला आहे.
यापूर्वीची वाहने केवळ तीन ते चार वर्षांपूर्वीच खरेदी केली आहेत, ती सुस्थितीत असल्याने नव्या गाड्यांची हौस का, असा सवालही त्यांनी केला आहे.