भिवंडी : राज्यभरात हाेणाऱ्या आगामी महापालिका निवडणुका भाजप बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) या गटासोबत युती करून एकत्रित लढविणार असल्याचा पुनरुच्चार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे केला.
बावनकुळे शुक्रवारी पक्षाच्या आढावा दौऱ्यासाठी भिवंडीत आले हाेते. त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी माधवी नाईक, भाजप शहराध्यक्ष संतोष शेट्टी, आमदार महेश चौघुले, रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष महेंद्र गायकवाड, सुमित पाटील उपस्थित होते. त्याआधी त्यांनी भाजप कोअर कमिटीची बैठक घेतली. तसेच पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवादही साधला. आजपासून तीन दिवस ठाणे जिल्ह्याचा दौरा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
बावनकुळे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्षांच्या सत्ताकाळात काहीच काम केले नाही. आता भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना हे युतीचे सरकार चांगले काम करत असताना आघाडीतील घटक पक्ष चुकीची माहिती पेरून सरकारची प्रतिमा खराब करीत आहे. खोटे सांगाल तर भाजपची संघटना रस्त्यावर उतरून विरोध करेल. तसेच येत्या काळात भिवंडी शहराला भरीव विकास निधी मिळवून देण्यासाठी आपण व्यक्तिशः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करणार आहोत.
‘अंधारे यांनी आपली उंची पाहून टीका करावी’
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आपली उंची पाहून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करावी, अशी टीका बावनकुळे यांनी केली. तसेच राज्य सरकारचे समर्थक असलेले आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्या वादात भाजप पडणार नाही. मात्र, त्यांनी रस्त्यावर भांडू नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.