ठाणे : जिल्ह्यातील ३५ ग्रामपंचायतींसाठी १३७ मतदान केंद्रांवर रविवार ६६ हजार ५०७ मतदारांपैकी ८० टक्के म्हणजे ५३ हजार ४१४ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. जिल्ह्यातील कल्याण, भिवंडी, शहापूर, मुरबाड आदी तालुक्यांतील मतमोजणी संबंधीत तहसीलदारांनी त्यांच्या कार्यालय परिसरात केली. यादरम्यान विजयी कार्यकर्त्यांचा जल्लोष लक्षात घेता भाजपा व शिंदे गटाच्या बाळासाहेबांची शिवसेनेचा वर्चष्मा दिसून आला.
जिल्ह्यातील ४२ ग्राम पंचायतींच्या निवडणुका हाती घेण्यात आल्या होत्या. त्यापैकी सात ग्राम पंचायतीं बिनविरोध विजयी झाल्या होत्या. उर्वरित ३५ ग्राम पंचायतींच्या सरपंच पदासाठी ११४ उमेदवार व २१९ सदस्यांसाठी ६१३ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. कल्याणच्या आठ ग्राम पंचायतींची मतमोजणी पंचायत समिती सभागृत पार पडली. तर भिवंडीच्या १३ ग्रा.प.ची मतमोजणी वºहाळदेवी मंगल भवन, कामतघर येथे पार पडली. शहापूरमधील तीन ग्रा.प.ची मतमोजणी तलाठी भवन, तहसिलदार कार्यालयात आणि मुरबाडच्या ११ ग्रा.पं.ची मतमोजणी तहसिलदार कार्यालय परिसरात पार पडली.
मुरबाड तालुक्यातील या ग्रा.पं.च्या निवडणुकांमध्ये भाजपा व शिंदे गटाच्या शिवसेनेचे सर्वाधिक ग्रा.पं.वर वर्चस्व पाहायला मिळाले.तर ठाकरे गटाच्या शिवसेनेने दोन ग्रा.प.वर दावा केला आहे.या ११ ग्रा.पं.च्या या निवडणुकीत शिवसेना शिंदे गट व भाजपा आमदार किसन कथोरे गटाचे वर्चस्व दिसून आले.खासदार कपिल यांच्या गटाचे दोन सरपंच मात्र कॉंग्रेस व राष्ट्रवादीला सपशेल अपयश आले आहे.
कल्याण तालुक्यात शिवसेनेच्या ठाकरे, शिंदे गटांचे वर्चस्व उघड झाले. या दोन्ही गटांनी प्रत्येकी तीन ग्रामपंचायतींवर दावा केला.तर वासुंद्रीत ठाकरे गट, वंचित बहुजन आघाडीची युती सरस ठरली. तर भाजपने दोन ग्रा.पं. मिळवल्याचा दावा केला आहे. एका ग्रा.पं.अपक्षाकडे गेली. जिल्ह्यात सर्वाधिक भिवंडी तालुक्यातील १३ ग्रा.पं.च्या निवडणुका पार पडल्या. यामध्ये भाजपचा बोलबाला दिसून आला. भाजपाने सर्वाधिक आठ ग्रा.पं.वर दावा केला आहे. शिंदे गटाच्या शिवसेनेला चार तर ठाकरे गटाच्या सेनेला एक जागेवर समाधान मानावे लागल्याचे आढळून आले. तर या तालुक्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकाही ग्रा.पंवर दावा करण्यात आला नाही. राज्याच्या सत्तेत एकत्र असूनही या निवडणुकीत बहुतांश ठिकाणी भाजप विरोधात शिंदे गट असेच समीकरण पाहायला मिळाले. विशेष म्हणजे केंद्रीय पंचायती राजमंत्री कपिल पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीत महत्वाच्या कोन ग्रा.पं.च्या निवडणुकीत भाजपने शिंदे गटाच्या उमेदवाराचा दारुण पराभव झाला.
शहापुर तालुक्यातील पाच ग्रा.पं.पैकी नांदवळसाठी एकही उमेदवारी अर्ज आला नव्हता.बिनविरोध बाभळे व चिखलगाव भाजपाने दावा केला आहे.कानवेवर उध्दव ठाकरे शिवसेना पक्षाने दावा केला आहे. मात्र या तालुक्यातील ग्रां.पं.वर सर्व पक्षांचा समिश्र प्रतिसाद दिसून आला आहे.