लोकमत न्यूज नेटवर्क मीरा रोड : भाजपा व बहुजन विकास आघाडी यांच्यातील युतीचे भिजत घोंगडे कायम असल्याने बविआच्या इच्छुक उमेदवारांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. अनेकांनी कार्यालये थाटून प्रचारही सुरु केला असला तरी जागा वाटपाची स्पष्ट भूमिका न घेता आमदार हितेंद्र ठाकूर अजून अधांतरीच असल्याची चर्चा सुरू आहे. मीरा-भार्इंदरला लागूनच असलेल्या वसई - विरार महापालिकेत एकहाती सत्ता मिळवणाऱ्या बविआ नेतृत्वाचे मीरा भार्इंदरकडे चाललेले दुर्लक्ष आश्चर्यकारक आहे. बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा आमदार हितेंद्र ठाकूर व भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांची जवळीक नवीन नाही. मेहतांसह गीता जैन यांनाही महापौरपदी बसवण्यात ठाकूर यांची भूमिका मोलाची मानली जाते. ठाकूर व मेहतांचा याराना असतानाही मीरा- भार्इंदरमध्ये बविआ वाढू शकली नाही. २००७ च्या निवडणुकीत बविआचे २ नगरसेवक तर २०१२ च्या निवडणुकीत ३ नगरसेवकांपर्यंत बविआने मजल मारली; परंतु पक्ष बांधणीकडे ठाकूर यांनी केलेले दुर्लक्ष स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कोड्यात टाकणारे आहे. आमदार मेहता या स्थानिक भाजपा नेतृत्वालाच बविआ नेतृत्वाने झुकते माप दिल्याने पालिका निवडणुकीचा बिगूल वाजताच कामाला लागलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. शिवसेनेने बविआशी युती शक्य नसल्याचे स्पष्ट केल्याने आता ठाकूर व मेहतांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यंदा चार नगरसेवकांचा प्रभाग झाल्याने राजू व भावना भोईर तसेच मोहन जाधव हे नगरसेवक अन्य पर्यायांच्या शोध घेत आहेत. भोईर दाम्पत्याला मेहतांनीच भाजपात ओढण्याची खटपट चालवली आहे. त्यासाठी आश्वासनांची खैरात सुरू आहे. तर जाधव यांना मात्र भाजपा - सेनेचे दरवाजे बंद असल्याने निवडणूक सोपी राहिलेली नाही. बविआच्या भावना भोईर यांना महापौरपदी बसवण्याचे भोईर कुटुंबीयांचे मनसुबेही धुळीस मिळवण्यात आले असले तरी मेहतांसोबत जुळवून घेण्याशिवाय पर्याय नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. बविआकडे आतापर्यंत ११० इच्छुक उमेदवरांनी अर्ज भरले आहेत; पण ठाकूर-मेहता यांच्या नुसत्या गाठीभेटीच सुरू असल्याने इच्छुकांना तोंड देतादेता जिल्हाध्यक्ष अविनाश गुरव यांच्या नाकीनऊ आले आहेत. मूळात पालिकेतील भाजपासोबतची युती व शहरातील कारभाराबद्दल स्वत: गुरव यांनी जाहीर टीका केली आहे. ठाकूर व मेहता हे निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असतानाही अद्याप जागा वाटपाबाबत टोलवाटोलवी का करत आहेत? असा प्रश्न कार्यकर्त्यांना सतावत आहे. जागा वाटपाचा तिढा नसून यंदा त्यांना तीनचे पाच नगरसेवक निवडून यावे, अशी अपेक्षा आहे. त्याच बरोबर त्यांना संघटना टिकवायची आहे. बविआच्या भोईर दाम्पत्याचा भाजपा प्रवेश योग्यवेळी होईल. - नरेंद्र मेहता, आमदार ११० इच्छुक उमेदवारांची यादी तयार आहे. कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. भाजपा युतीबद्दल नेतृत्व जो निर्णय घेईल त्यानुसार ताकदीने लढण्याची तयारी आहे. - अविनाश गुरव, जिल्हाध्यक्ष, बविआ.
भाजपा-बविआ युती अधांतरी?
By admin | Published: July 08, 2017 5:35 AM