मीरा रोड : ऐतिहासिक घोडबंदर किल्ल्याचे पालकत्व मीरा-भार्इंदर महापालिकेस मिळाल्यानंतर शिवसेनेच्या वतीने शिवजयंतीच्या कार्यक्रमास काँग्रेसचे नेते उपस्थित होते. मात्र, दुसरीकडे निमंत्रण देऊनही भाजपाने मात्र बहिष्कार टाकला. यावेळी संपूर्ण किल्ला रोषणाईने झळाळून निघाला होता. महिलांच्या लेझीम पथकासह शिवकालीन वेशभूषेत नटलेल्या महिला व पुरुषांनी घोडबंदर गावातून मिरवणूक काढली. शाहीर यशवंत जाधव यांनी महाराजांसह संभाजीराजांच्या जीवनावर आधारित पोवाडे तसेच गोंधळ आदी पारंपरिक कला सादर केली.
यावेळी घोडबंदर किल्ला परिसरात मंजूर झालेल्या शिवसृष्टीच्या संकल्पनेची चित्रफीत सादर करण्यात आली. संकल्पना तयार करणारे कलादिग्दर्शक नितीन कुलकर्णी यांचा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. घोडबंदर किल्ल्याला गतवैभव मिळावे, म्हणून आमदार प्रताप सरनाईक गेली सात वर्षे सतत पाठपुरावा करत होते. शिवसृष्टी साकारण्यासाठी आपण एक कोटीचा निधी दिला असून आणखी निधी लागला, तरी सरकार कमी पडू देणार नाही, असे आश्वासन यावेळी पालकमंत्र्यांनी दिले. खासदार राजन विचारे, आमदार रवींद्र फाटक आदी उपस्थित होते. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मुझफ्फर हुसेन यांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला.सरनाईक यांनी स्वत: आमदार नरेंद्र मेहता यांना फोनवरून कार्यक्रमाचे निमंत्रण दिले होते. गटनेते हरिश्चंद्र आमगावकर यांनी महापौर डिम्पल मेहता, उपमहापौर चंद्रकांत वैती, स्थायी समिती सभापती रवी व्यास आदींना निमंत्रण दिल्याचे सांगितले.कार्यक्रमाचे निमंत्रण होते. याबद्दल आमदार नरेंद्र मेहतांशी चर्चा केली होती. पण, हा कार्यक्रम पक्षाचा असल्याने जाण्याची आवश्यकता नसल्याचे निर्देश मिळाले म्हणून गेलो नाही. बहिष्कार वगैरे नाही. तो त्यांच्या पक्षाचा कार्यक्रम होता.- रवी व्यास, सभापती, स्थायी समितीशिवसैनिक खोटे बोलत आहेत. मला कोणी कुठल्याही प्रकारे निमंत्रणच दिले नाही. त्यामुळे गेलो नाही. यात बहिष्काराचा प्रश्न कुठे येतो? आमदार, महापौर आदींना निमंत्रणच दिले नसेल. म्हणून कुणी गेले नसावेत.- ध्रुवकिशोर पाटील, नगरसेवकपालिकेत सत्तेत असलेल्यांना घोडबंदर किल्ल्याच्या सुशोभीकरणाच्या कामाच्या भूमिपूजनासाठी वेळ का मिळत नाही. जाणूनबुजून विलंब केला जात आहे. आचारसंहिता लागण्यापूर्वी भूमिपूजन करून कामाला सुरुवात करा. अन्यथा, शिवसेना स्टाइलने भूमिपूजन करू.- प्र्रताप सरनाईक, आमदार