- सदानंद नाईकउल्हासनगर : राज्यभर भाजपची मेगाभरती सुरू असताना राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत कलानी कुटुंबाच्या कट्टर समर्थकांना भाजपमध्ये प्रवेश दिला. या प्रकाराने महापालिकेतील भाजप-ओमी टीमच्या आघाडीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत भाजप-कलानी अशी लढत रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे.उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात भाजपचे तिकीट मिळवण्यासाठी माजी आमदार व शहराध्यक्ष कुमार आयलानी यांच्यासह साई पक्षाचे प्रमुख जीवन इदनानी, ओमी टीमचे प्रमुख ओमी कलानी, भाजपचे गटनेते जमनुदास पुरस्वानी, माजी अध्यक्ष महेश सुखरामणी, साई पक्षाचे शेरी लुंड व कांचन लुंड यांनी मुलाखती दिल्या. प्रत्यक्षात, आयलानी यांनी यापूर्वीच प्रचाराला सुरुवात केली. शनिवारी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत टाउन हॉलमध्ये कलानी कुटुंबाचे कट्टर समर्थक माजी उपमहापौर विनोद तलरेजा, माजी नगरसेवक गणपत एडके, पृथ्वी वलेच्छा, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष नरेश दुर्गानी, श्याम मेजर, जगदीश आवारे, खुशी पमनानी, पप्पू बहरानी, जेठू चांदवानी आदींनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे महापालिका सत्तेतील मित्रपक्ष ओमी टीमला भगदाड पाडल्याची चर्चा शहरात होत असून कलानी कुटुंबाला बाजूला सारल्याचे चित्र निर्माण झाले आहे.महापालिकेवर मित्रपक्ष शिवसेनाविना भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी भाजपने थेट पप्पू कलानी याचा मुलगा ओमी कलानी यांच्या ओमी टीमसोबत आघाडी करून महापालिका निवडणूक लढवली. मात्र, महापालिकेत बहुमताच्या संख्येएवढे नगरसेवक निवडून आले नाहीत. तेव्हा एका रात्रीत ११ नगरसेवक असलेल्या स्थानिक साई पक्षाचे प्रमुख जीवन इदनानी यांच्याशी संधान बांधून इदनानी यांची थेट मुख्यमंत्र्यांची राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी भेट घालून दिली. तसेच भाजप आघाडीत साई पक्षाचा समावेश केला. बहुमताला ४० नगरसेवक आवश्यक असताना भाजप आघाडीकडे भाजप-ओमी टीमचे ३२ व साई पक्षाचे ११ असे एकूण ४३ नगरसेवक झाले. भाजपचे शहराध्यक्ष व माजी आ. कुमार आयलानी यांची पत्नी मीना आयलानी यांना महापौरपदाचा पहिला मान मिळाला, तर साई पक्षाला उपमहापौर व स्थायी समिती सभापतीपद देण्यात आले.>ओमी टीमची भाजपने केली कोंडीओमी टीममुळे भाजपची सत्ता महापालिकेवर आली. त्यांनाच सत्तेबाहेर ठेवण्याचे कारस्थान भाजपने केल्याची टीका शहरात होत आहे. महापौरपदाच्या पहिल्या टर्मपैकी सव्वा वर्षाची महापौर टर्म ओमी टीमला देण्याचे ठरले होते. मात्र, दोन महिने भाजपचे उंबरठे झिजवल्यानंतर कलानी कुटुंबाच्या सून पंचम कलानी महापौर झाल्या. भाजपवर विश्वास ठेवून ओमी टीमच्या समर्थकांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली. तसेच आ. ज्योती कलानी यांच्यासह इतर समर्थक भाजपप्रवेशास उत्सुक असताना प्रवेशास अद्यापही हिरवा झेंडा मिळालेला नाही. भाजपच्या दुतोंडी भूमिकेने कलानी समर्थकांत नाराजी पसरली आहे.
ओमी टीमला भाजपचे भगदाड
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 1:06 AM