ठाणे - महाराष्ट्रात सध्या कायद्याचे राज्य नसून गुंडाराज असल्याची टीका भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ (BJP Chitra Wagh) यांनी केली. राज्यात अशा प्रकारे गुंडाराज पसरत असल्याने महिला दहशतीखाली जगत असल्याची गंभीर टीका देखील त्यांनी केली आहे. ठाणे महापालिकेच्या माजिवडा मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे आणि त्यांच्या सुरक्षा रक्षक यांची बुधवारी रुग्णालयात भेट घेऊन त्यांनी विचारपूस केली. पिंपळे यांच्यावर झालेल्या हल्याचा निषेध करीत चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारला धारेवर धरत महाराष्ट्रात सरकार नावाची चीज आहे का? असा सवाल केला.
महाराष्ट्रात व्यावसायिक, प्रशासकीय महिला अधिकारी देखील सुरक्षित नाहीत त्यामुळे इथे गुंडाराज असल्याचा आरोप त्यांनी केला. या घटनेची संपूर्ण महाराष्ट्रात पडसाद उमटले आहेत, परंतु सध्याचे सरकार काय करत आहे, असा सवालही त्यांनी केला. फडणवीस सरकारच्या काळात फेरीवाले धोरण पुढे आणले गेले. परंतु आता ते धोरण राबविले जात नसल्यानेच फेरीवाल्यांची संख्या आणि त्यांची मुजोरी वाढत असल्याची टिकाही त्यांनी केली. महिलांचे कार्य करण्यासाठी विविध संघटना कार्यरत आहेत, परंतु त्यावर महिला नाहीत, ही एक शोकांतिका आहे. त्यामुळे या समित्यांमध्ये महिलांची निवड करण्यात यावी अशी मागणी देखील त्यांनी केली. तर त्या अशा घटना भविष्यात होऊ नये यादृष्टीकोनातून ठोस पावले उचलण्याची मागणी पोलीस आयुक्तांकडे करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून देखील याबाबत एक ट्विट केलं आहे. "महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचे एवढे धिंडवडे कधीचं उडाले नव्हते... कायदाराज नाही गुंडाराज सुरू आहे" असं म्हणत ठाकरे सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडण्यात आलं आहे. "ठाणे मनपा उपायुक्त कल्पिता पिंपळे कर्तव्यावर असताना त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करतं बोटे छाटण्यात आली… हे लिहीतानाही जीवाचा थरकाप होतोय... सुदैवाने त्या व अंगरक्षक पालवे वाचले. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचे एवढे धिंडवडे कधीचं उडाले नव्हते...कायदाराज नाही गुंडाराज सुरू आहे इथे" असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.