अंबरनाथ : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती निश्चित होईल. मात्र युती झाली तरी, कल्याण लोकसभेवर शिवसेनेचा तर अंबरनाथ विधानसभा मतदारसंघावर भाजपाचा दावा राहील. हा मतदारसंघ भाजपासाठी अनुकूल असल्याचा दावा अंबरनाथच्या प्रभारी पूर्णिमा कबरे यांनी केला.भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष भरत फुलोरे यांनी अंबरनाथ उद्योग विभागाच्या अध्यक्षपदी सुमेध भवार यांची निवड केली. त्यांच्या निवडीची घोषणा करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत कबरे यांनी अंबरनाथ मतदारसंघावर दावा केला. भवार हे उद्योग क्षेत्राशी निगडीत असल्याने औद्योगिक क्षेत्रातील समस्या सोडविण्यासाठी भवार यांची नियुक्त करण्यात आली आहे. अंबरनाथमधील गटातटांच्या राजकारणाबाबत विचारले असला, भाजपामध्ये एकजूट असून कोणताही गट नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.अशा परिस्थितीत युती झाल्यास भाजपाचा उमेदवार कसा विजयी होणार, अशी विचारणा केली असता कल्याण लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्याने अंबरनाथ विधानसभा शिवसेनेने भाजपाला सोडावी, असे कबरे यांनी सांगितले. किसन तारमेळे, अजय जाधव आदी उपस्थित होते.
अंबरनाथ मतदारसंघावर भाजपाचाच दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2018 12:28 AM