कल्याण : आर. आर. पाटील, पतंगराव कदम आणि गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर त्यांच्या जागेसाठी ज्या निवडणुका-पोटनिवडणुका झाल्या त्या वेळी तेथे शिवसेनेने उमेदवार दिले नव्हते. तसाच विचार करून भाजपा, काँग्रेसने पालघरमध्ये उमेदवार न देता किंवा दिलेली उमेदवारी मागे घेऊन वनगा यांच्या मुलाला बिनविरोध निवडून द्यावे. वनगा परिवारातील उमेदवाराला पाठिंबा द्यावा, असे आवाहन शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बुधवारी केले.खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर पालघरला पोटनिवडणूक होत आहे. वनगा यांचा मुलगा आणि कुटुंबाने शिवसेनेत प्रवेश केल्याने शिवसेनेने त्यांच्या मुलाला उमेदवारी दिली. पण ही निवडणूक वेगळ्या परिस्थितीत लढविली जात असल्याने सेनेसाठी ती राजकीय फायद्यासाठी नसल्याचे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे राजेंद्र गावित यांना भाजपामध्ये प्रवेश देऊन, त्यांना उमेदवारी देऊन शिवसेनेतील वनगा यांच्या प्रवेशाला शह देण्याचा प्रयत्न केला आहे का, असे विचारता शिंदे म्हणाले, भाजपाने कोणाला पक्षात घ्यावे, हा त्यांचा निर्णय आहे. त्यामुळे त्यांनी शिवसेनेला शह दिला आहे, असे मला तरी वाटत नाही.
‘भाजपा, काँग्रेसने वनगांना पाठिंबा द्यावा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 4:59 AM