मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या बीएसयुपी योजनेत नगरसेवक पद व पालिकेतील सत्तेचा गैरपवर करून माजी भाजपा नगरसेविका मीरादेवी यादव व कुटुंबीयांनी २ दुकान आणि ३ सदनिका काही बनावट व खाडाखोड केलेल्या कागदपत्रांच्या आधारे तसेच एकाच रेशनकार्ड वर मंजूर केले गेल्याचे माहिती अधिकारात उघडकीस आले आहे.
काशीमीराच्या जनता नगर झोपडपट्टी परिसरातून मीरादेवी ह्या २००७ साला पासून महापालिकेच्या निवडणुकीत नगरसेविका म्हणून निवडून येत आहेत . २००९ साली जनता नगर झोपडपट्टी साठी महापालिकेने बीएसयुपी योजना अमलात आणल्या नंतर मीरादेवी व त्यांचे पती रामलाल , मुलगा संतोष आणि दीर शामलाल याना दुकाने व सदनिका मंजूर केले गेले आहेत .
मीरादेवी यांच्या नावाने ९१३ क्रमांकाचे घर असून अर्जात १९९४ सालचा ५ रुपयांच्या स्टॅम्प पेपर वर अकबर शेख कडून सदनिका १८ हजारांना खरेदी केली दाखवली आहे . मात्र त्यात मीरादेवी चे नाव खाडाखोड करून रामलालच्या आदी लिहले गेले आहे . १९९१ साली कर आकारणीचा अर्ज मात्र असगर शेख नावाने आहे.
मीरादेवी यांचे पती रामलाल यांचा ११३२ क्रमांकाचे दुकान नमूद असून त्यात जोडलेला संतोष डेअरी चा गुमास्ता परवाना हा मीरारोडच्या पुनमसागर कॉम्प्लेक्स भागातला असून त्यात खाडाखोड करून तो वापरला आहे . तक्रारी नंतर पालिकेने तो अपात्र ठरवला मात्र परत पात्र ठरवण्यात आला .
मीरादेवी यांचा मुलगा संतोषच्या नावाने ११६८ क्रमांकाचे घर नमूद आहे . अर्जात दोन स्टॅम्प पेपर वरचे करार असून २००९ च्या करारात आजोबा राजपती कडून ६५ हजारांना खोली खरेदी केल्याचे नमूद आहे. या शिवाय २००५ साली रामलाल व शामलाल यांनी सदर झोपडे मणिलाल यादव कडून विकत घेतल्याचा करार जोडला आहे .
दीर शामलाल यांच्या नावाने ११३३ क्रमांकाने दुकान व २२८४ क्रमांकाने घर नमूद केले आहे . दुकानासाठी संतोष किराणा स्टोर्स चा गुमास्ता दाखला जोडला आहे . तर घरा साठी १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपर वर नोटरी केलेला करारनामा जोडला आहे . करारात सीमा यादव यांनी घर हे शामलाल यांना विनामूल्य हस्तांतरित केले आहे .
माहिती अधिकारात मिळालेल्या अर्ज निहाय कागदपत्रात , २ गाळे व ३ सदनिका दाखवताना प्र्त्येक अर्जात रेशनकार्ड मात्र एकच ००६८८२३ अनुक्रमांकाचे आहे . मीरादेवी , रामलाल आणि शामलाल यांच्या अर्जासोबत दिलेले वीज बिल देखील एकच असून ते रामलालच्या नावे असलेले खाते क्रमांक १०१६५७२१८ चे आहे . शामलाल यांच्या घर आणि दुकान साठीच्या अर्जासोबत त्यांच्या नावे असलेला पालिकेचा मालमत्ता क्रमांक एन ०१००१४७९२०० हा एकच आहे . मीरादेवी व संतोष यांच्या नावाने पालिकेत मालमत्ता कर आकारणीच नसल्याचे तसेच शामलाल यांच्या नावाने एन / १२२२ व रामलाल यांच्या नावाने एन / १२२३ अशी कर आकारणी असल्याचा पालिकेचा अहवाल असून एकाच मालमत्तेची विभागणी केल्याचा आरोप होत आहे .
मीरादेवी यादव ( माजी नगरसेविका , भाजप ) - आपले सासरे १९८० पासून रहात होते . येथील जनतेने मला तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून दिले असून रामभवन शर्मा हे राजकीय द्वेषाने आमची बदनामी करण्यासाठी खोटे आरोप व खोट्या तक्रारी करतात . महापालिका अधिकाऱ्यांनीसर्व पुरावे - कागदपत्रे यांची सत्यता पडताळूनच सदनिका पात्र ठरवल्या आहेत .
रामभवन शर्मा ( उपशहरप्रमुख , शिवसेना शिंदे गट ) - मीरादेवी यांनी जनतेचा विश्वासघात केला . नगरसेवक पदाचा गैरवापर करून सत्तेच्या बळावर एकसारखेच पुरावे देत पालिका अधिकारी व ठेकेदार यांच्यावर दबाव टाकून, काही बनावट व खाडाखोड केलेली कागदपत्रे जोडून २ दुकाने व ३ सदनिका लाटल्या आहेत . महापालिका , शासनची फसवणूक व आर्थिक नुकसान केले आहे . त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक व भादंवि नुसार गुन्हा दाखल करून सदनिका - दुकाने रद्द करावीत .
शौचालयावर दाखवलेले घर केले रद्द
सर्वेक्षणात २३९९ हे एकमजली सार्वजनिक शौचालय दाखवलेले आहे . तसे असताना त्या झोपडीक्रमांकाचा अर्ज लाभार्थी म्हणून मीरादेवी यांनी भरला होता . उदयराज यादव कडून ते घर दिड लाखांना खरेदी केल्याचा १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपर वरचे करारपत्र जोडले होते. परंतु पालिकेने मीरादेवी यांच्यावर कारवाई न करता त्यांचे दोन घरांसाठी अर्ज आल्याचे कारण नमूद करून २३९९ झोपडी क्रमांकचा अर्ज रद्द ठरवला .