ठाणे - महापालिकेच्या 2017 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत गुन्हे विषयक प्रतिज्ञापत्र निवडणूक विभागाला सादर न केल्याने भाजपचे नगरसेवक अशोक राऊळ यांच्या विरोधात शिवसेनेचे उमेदवार मंदार विचारे यांनी न्यायालयात धाव घेतली होती. यापूर्वी ठाणे न्यायालयाने अशोक राऊळ यांचे नगरसेवक पद रद्द केले होते. परंतु खालच्या कोर्टाच्या या निर्णयाविरोधात अशोक राऊळ यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
मात्र, उच्च न्यायालयानेही खालच्या न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत, राऊळ यांचे नगरसेवक पद रद्द केले आहे. यासंदर्भात सोमवारी उच्च न्यायालयाचा निकाल जाहीर झाला. येत्या 8 महिन्यावर आलेल्या ठाणे महापालिका निवडणुकीआधी हा निकाल आल्याने ठाणे भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.