मीरा रोड : कोरोना रुग्णाच्या दारावर जाऊन पालिकेच्या कंटेनमेंट झोनचा फलक लावून स्वत:चे फोटो काढून व ते व्हायरल झाल्याने भाजप नगरसेविकेविरुद्ध संतापाची लाट उसळली आहे. नगरसेविकेसह गृहनिर्माण संस्थेच्या सचिवाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी मराठा संघ व मनसेने केली आहे.प्रभाग १७ मधील भाजपच्या नगरसेविका हेमा बेलानी यांच्या प्रभागातील शांतीपार्कमधील एका इमारतीत राहणाऱ्यांना १ जून रोजी पालिकेच्या जोशी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या अहवालात कोरोना झाल्याचे आढळले. १ जूनपासून त्यांची पत्नी, दोन मुली व सहा वर्षांचा मुलगा यांना होम क्वारंटाइन केले होते .परंतु या रहिवाशाला पालिकेच्या क्वारंटाइन कक्षात नेऊन ठेवले. वास्तविक ते सर्व होम क्वारंटाइन असताना इमारतीचा सचिव अरविंद सिंह व नगरसेविका बेलानी यांच्या सांगण्यावरूनच पालिकेने त्या रहिवाशाला क्वारंटाइन कक्षात नेले. तसेच नेतानाचा व्हिडीओ काढून तो व्हायरल केला असा संताप कोरोनातून बरे झालेल्या रुग्णाने व्यक्त केला. सध्या त्यांची पत्नी आणि तिन्ही मुले क्वारंटाइन कक्षातच आहेत . तर त्यांना ११ जून रोजी रात्री पालिकेने घरी सोडले . दरम्यान त्यांच्या सदनिकेबाहेर कंटेनमेंट झोनचा एक नव्हे तर दोन मोठे फलक लावले.फलक व सदनिकेसोबत स्वत: बेलानी यांनी फोटो काढले. फोटो व्हायरल करुन हे ठिकाण ९ ते २३ जूनपर्यंत कंटेनमेंट झोन असल्याचे नमूद केले. मानसिक त्रास झाल्याने या रहिवाशाने कारवाईची मागणी केली आहे.मराठा संघाचे संदीप राणे , संगीता जगताप , मनोज राणे आदींनी या कुटुंबावर केलेल्या अत्याचाराचा निषेध करत कारवाईची मागणी केली आहे . तर मनसेनेही पोलीस उपअधीक्षक व स्थानिक पोलिसांना निवेदन देऊन हेमा बेलानी आणि अरविंद सिंह यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.‘माझा त्या घटनेशी काहीही संबंध नाही’हेमा बेलानी यांनी मात्र पालिकेचा आरोग्य विभाग आणि सोसायटीचे अरविंद सिंह यांनी बोलावले म्हणून बॅनर लावताना तेथे गेली होती. आपण काही चुकीचे केलेले नाही. त्यांच्या कुटुंबियांना घरातून क्वारंटाइन केंद्रात नेले याच्याशी माझा संबंध नाही असे सांगितले.
CoronaVirus News: कंटेनमेंट झोनच्या फलकापुढे भाजपा नगरसेविकेचे चक्क फोटो सेशन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2020 12:46 AM