ठाणे : ठाणे महापालिकेचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आला असताना, सावरकरनगरमध्ये शिवसेना आणि भाजपाचे कार्यकर्ते आपसात भिडले. प्रचाराचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्याला मारहाण करून तिचा विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी भाजपाचे उमेदवार विलास कांबळे, विद्यमान नगरसेवक राजकुमार यादव आणि कुख्यात गुंड मयूर शिंदे यांच्याविरोधात वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.महिला पदाधिकाऱ्याला मारहाण आणि विनयभंगाचा प्रकार उघड होताच शिवसैनिकांनी कथित आरोपींवर कारवाई करावी, यासाठी वर्तकनगर पोलीस ठाण्याबाहेर मध्यरात्री ठिय्या दिला होता. पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर ते माघारी परतले. शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या असलेल्या ४७ महिला पदाधिकारी सावरकरनगरातील विश्वेश्वर मंदिरासमोर प्रचाराचा जाब विचारण्यासाठी गेल्या असताना विलास कांबळे, मयूर शिंदे आणि राजकुमार यादव या तिघांनी त्यांना मारहाण करून विनयभंग केला. या घटनेनंतर, शिवसैनिक आक्रमक झाले. त्यांनी याप्रकरणी कारवाई करण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार रवींद्र फाटक आणि ठाणे लोकसभा जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांच्यासोबत वर्तकनगर पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या दिला. याचदरम्यान भाजपाचे कार्यकर्ते विनोद त्रिभुवन यांनी दिलेल्या तक्रारीत ते त्यांचा मित्र दीपक मिश्रा याच्या आजारी असलेल्या आईला पाहण्यासाठी जाताना, ओंकारेश्वर अपार्टमेंटजवळ शिवसेनेच्या पाच जणांनी संगनमत करून मारहाण केली, अशी तक्रार दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. या दोन्ही गुन्ह्यांत कोणालाही अटक झालेली नाही. (प्रतिनिधी)भाजपाने ‘नाकारलेला’ त्यांच्याच उमेदवारासोबतनिवडणूक काळात मतदारांत दहशत निर्माण होऊ नये, म्हणून गुंडांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येते. पण, वर्तकनगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यात कथित आरोपी असलेला मयूर शिंदे हा कुख्यात गुंड असूनही तो मोकाट फिरत असल्याचे शिवसैनिकांचे म्हणणे आहे. शिंदे याने काही दिवसांपूर्वी शिवसेनेतून भाजपात प्रवेश केला होता. नंतर, मात्र असा प्रवेश झाल्याचे भाजपाने नाकारले. आता सावरकरनगरमध्ये घडलेल्या घटनेनिमित्त मयूरचे नाव भाजपाच्या उमेदवाराशी जोडले गेले आहे.
भाजपा नगरसेवक, उमेदवारावर विनयभंगाचा गुन्हा दाखल
By admin | Published: February 20, 2017 6:02 AM