मीरारोड - भाईंदर पश्चिम येथील भाजपा नगरसेविका पाय फ्रॅक्चर झाल्याने घरी असताना तिच्या घरी जाऊन तिला स्थायी समिती सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचे पत्र द्यायला लावण्यात आल्यावरून वाद निर्माण झाला आहे. काल राजीनाम्याचे पत्र देणाऱ्या त्या नगरसेविकेने आज मात्र आयुक्तांना स्वतःच आपले ते पत्र ग्राह्य धरू नये असे कळवले आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्या नगरसेविकेचे राजीनामा पत्र महापौरांच्या दालनात टाईप केले गेले.
मीरा भाईंदर महापालिकेत भाजपाची एकहाती सत्ता असून स्थायी समिती मधून ८ सदस्य निवृत्त होणार आहेत. त्या नंतर नवीन सदस्य नियुक्ती सह सभापती निवडणूक लागणार आहे. समितीमध्ये भाजपाचे १० , शिवसेनेचे ४ व काँग्रेसचे २ असे संख्याबळ आहे. त्यामुळे भाजपा मध्ये स्थायी समिती सभापती पदासाठी सुरेश खंडेलवाल, दिनेश जैन, प्रशांत दळवी, ध्रुवकिशोर पाटील आदी इच्छुकांच्या नावाची चर्चा आहे. माजी आमदार नरेंद्र मेहतांनी त्यांची वादग्रस्त व्हिडीओ क्लिप व्हायरल झाल्याने भाजपच्या पदांचा राजीनामा व राजकारण सोडल्याचे जाहीर केले होते. नंतर त्यांच्यावर बलात्कारचा गुन्हा दाखल झाला.
तसे असले तरी मेहतांनी भाजपावर आपली पकड कायम ठेवण्याचे प्रयत्न चालवले आहेत. महापौरांच्या दालनात आणि अँटीचेंबरमध्ये बसून आपले अस्तित्व दाखवून देण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यातूनच पालिकेची तिजोरी असलेल्या आणि निविदा मंजुरी कामात महत्वाच्या अशा स्थायी समितीवर आपल्या मर्जीतला सभापती आणि सदस्य बसवण्याच्या राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत.
भाईंदर पश्चिम येथील भाजपा नगरसेविका वैशाली गजेंद्र रकवी ह्या पाय फ्रॅक्चर झाल्याने घरीच आहेत. स्वतः मेहता त्यांच्या घरी गेले आणि स्थायी समिती सदस्यत्वाचा राजीनामा देण्यास सांगितले . त्या अनुषंगाने शुक्रवारी महापौर दालनात रकवी यांच्या राजीनाम्याचे पत्र टाईप करण्यात आले. रकवी यांचे पती गजेंद्र यांच्या उपस्थितीत हा प्रकार घडला आणि आयुक्तां कडे पत्र दिले गेले.
नगरसेविकेच्या पररस्पर घरी जाऊन राजीनामा घेण्यात आल्याचा प्रकार स्थायी समिती सभापती अशोक तिवारी , जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे , नगरसेवक रवी व्यास , सुरेश खंडेलवाल आदींना कळताच त्यांनी संताप व्यक्त केला . नगरसेविका पाय फ्रॅक्चरमुळे घरी अंथरुणाला खिळलेली आहे व मुलीची नीटची परीक्षा आहे आणि अशा स्थितीत पक्षाला कोणतीच कल्पना न देता हे राजीनामा घेण्याच्या प्रकारचा निषेध केला व रकवी कुटुंबियांना धीर दिला. त्यानंतर आज शनिवारी सकाळी स्वतः वैशाली रकवी यांनी आयुक्त डॉ. विजय राठोड यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगवर संपर्क साधला आणि आपला राजीनामा स्वीकारू नये असे स्पष्ट केले. शिवाय रकवी यांनी लेखी पत्र सुद्धा आयुक्तांना पाठवले आहे.