सदानंद नाईक
उल्हासनगर : कॅम्प नं-५ कैलास कॉलनी स्मशानभूमी मधील विधुत स्विच गिअर स्टेशन प्रस्तावाला विरोध करीत भाजप नगरसेवकांनी महासभा सभागृह बाहेर हंगामा घातला. अखेर प्रस्ताव स्थगित करून येणाऱ्या महासभेत नव्याने प्रस्ताव आणण्याचा निर्णय घेण्यात आला.
उल्हासनगर महापालिकेची महासभा गुरवारी दुपारी ४ वाजता सुरू झाल्यावर, भाजप नगरसेवकांनी स्मशानभूमी मध्ये ११०० चौ मी क्षेत्रफळ जागेत विधुत स्विच गिअर स्टेशन नको. अशी भूमिका घेतली. प्रशासनाकडून महासभेत चर्चेसाठी प्रस्ताव येताच भाजप नगरसेवकांनी विरोध करून हंगामा केला. विरोधी पक्षनेते राजेश वानखडे, भाजपचे गटनेते जमनुदास पुरस्वानी, नगरसेवक राजेश वधारीया, प्रदीप रामचंदानी यांच्यासह अन्य नगरसेवकांनी महापालिका महासभा सभागृह बाहेर धाव घेऊन गोंधळ केला. अखेर शिवसेना नगरसेवक राजेंद्र चौधरी, धनंजय बोडारे, अरुण अशान आदींनी मध्यस्थी केल्याने, विधुत स्वीच स्टेशनचा प्रस्ताव नव्याने पुढील महासभेत आणण्याचा निर्णय घेण्यात आला. भाजप नगरसेवकांनी याबाबत समाधान व्यक्त केले असून स्मशानभूमीत विधुत स्टेशन नको. ही भूमिका कायम असल्याचे वानखडे यांनी सांगितले.
महापालिका महासभेत अनेक विषयांवर वादळी चर्चा झाली असून मनसेने महापालिका शाळा क्रं-१९ व २७ भाडेतत्त्वावर देण्यास विरोध केला. तसे झाल्यास महापालिका भाडेतत्त्वावर देण्याची भूमिका मनसेची असेल. अशी भूमिका मनसे घेणार असल्याची प्रतिक्रिया मनसेचे शहाराध्यक्ष बंडू देशमुख व मनोज शेलार यांनी घेतली. दरम्यान मनसेने महापौर लिलाबाई अशान, उपमहापौर भगवान भालेराव, विरोधी पक्षनेते राजेश वानखडे, स्थायी समिती सभापती टोनी सिरवानी, आयुक्त डॉ राजा दयानिधी, उपायुक्त अशोक नाईकवाडे आदींना याबाबत निवेदन देऊन शाळा भाडेतत्वावर खाजगी संस्थेला देऊ नका. अशी विनंती निवेदनाद्वारे केली.