मीरा रोड : भार्इंदरच्या मुर्धा खाडी येथील अनधिकृत बांधकामांवरून भाजपा नगरसेविकेने अर्वाच्य भाषेत धमकी दिल्याची क्लिप व्हायरल झाली असून भार्इंदर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. मात्र, उपमहापौर चंद्रकांत वैती यांनी स्वपक्षाच्या नगरसेविकेचे समर्थन करून घरदुरुस्ती करणाऱ्यांना पत्रकार असल्याचे सांगून धमकावणाºया व पैसे उकळणाºयांना आवरा, असे साकडे आ. नरेंद्र मेहता यांना घातले आहे.भार्इंदर पश्चिमेच्या मुर्धा खाडी येथे शिवनाथ गुप्ता व माळी यांनी घर बांधण्यास घेतले आहे. सदर जमीन सरकारी असून सीआरझेडमध्ये येते. हे बांधकाम सुरू असताना तेथे एका स्थानिक साप्ताहिकाशी संबंधित प्रतिनिधी गेले व त्यांनी छायाचित्रे काढली. त्यावेळी बांधकाम करणाºयाने जाब विचारून त्या प्रतिनिधीचा भ्रमणध्वनी घेतला. त्या प्रतिनिधीला स्थानिक भाजपा नगरसेविका नयना म्हात्रे यांनी फोन करून तेथे का आला व फोटो का काढले, असा जाब विचारला. पैसे उकळण्याचे हे धंदे बंद करा, असे दरडावतानाच बांधकाम सुरू असलेल्या घरातल्या मुलीला कपडे फाडून पोलीस ठाण्यात तक्रार करायला पाठवेन, अशी धमकी म्हात्रे यांनी दिली. पुन्हा या भागात आला तर तुमचे कपडे अंगावर ठेवणार नाही, असा दम त्या प्रतिनिधीला भरला.याप्रकरणी साप्ताहिकाच्या प्रतिनिधीने भार्इंदर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला असून सोबत म्हात्रे यांच्या संभाषणाची क्लिप जोडली आहे. अनधिकृत बांधकामाला म्हात्रे यांचे असलेले संरक्षण, त्यांनी केलेली दमदाटी व गुन्ह्यात अडकवण्याची धमकी आदी गुन्ह्यांकरिता कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.उपमहापौर चंद्रकांत वैती यांनी मुर्धा गावात स्थानिकाने घर बांधायला घेतले असताना पत्रकार तेथे जाऊन त्रास देत असल्याने अशा लोकांना आवरा, असे साकडे जाहीर सभेत आमदार नरेंद्र मेहता यांना घातले. याबाबत वैती यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करून तसेच त्यांना मेसेज करूनही ते प्रतिक्रियेकरिता उपलब्ध झाले नाहीत.खारफुटी तोडून सरकारी जागेत होणाºया बेकायदा बांधकामांबद्दल मी सातत्याने तक्रारी करत आहे. पालिकेने वेळीच कारवाई केली पाहिजे. पण, पत्रकार व अन्य कोणी असल्याचे सांगून लोकांना भीती दाखवून सर्रास खंडणी वसुलीचा धंदा सुरू आहे. एखादा आपलं घर दुरु स्त करत असेल, तर त्याच्याकडून खंडणीवसुलीचा अधिकार यांना कोणी दिला? बांधकामांच्या ठिकाणी जाऊन, फोटो काढून कारवाईचा धाक दाखवून खंडणी उकळणाºयांची पालिका व पोलिसांनी सखोल चौकशी करून गुन्हे दाखल करावेत.- नयना म्हात्रे, स्थानिक नगरसेविका, भाजपा
भाजपा नगरसेविकेची पत्रकाराला धमकी, क्लिप व्हायरल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2018 3:18 AM