मीरा रोड : मुर्धा गावातील बेकायदा माती भराव प्रकरणी १७३ शेतकºयांना दंडात्मक कारवाईसाठी तहसीलदारांचे पत्र आल्याने खासदार राजन विचारे, माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा यांनी कारवाईला विरोध केला आहे. शेतकºयांची फसवणूक करून काही नगरसेवकांनी स्वत:च्या फायद्यासाठी भराव करुन घेत शेतकºयांना वेठीस धरल्याचा आरोप केला आहे. तर मंडळ अधिकारी यांनी गुरूवारी पुन्हा घटनास्थळाचा पंचनामा करत शेतकºयांचे जबाब घेतले असता त्यांनी नगरसेवकांची नावे घेतल्याने खळबळ उडाली आहे.मुर्धा गावामागील बांधावरुन मोठ्या प्रमाणात शेतकºयांच्या शेतजमिनीत भराव करण्यात आला आहे. भराव केल्या प्रकरणी तहसीलदारांनी तब्बल १७३ शेतकºयांना सुनावणीसाठी पत्र धाडल्याने गावात खळबळ उडाली. हा भराव सुरू असताना काही शेतकºयांनी सुरूवातीला त्यास विरोध केला होता. पालिका व तलाठी कार्यालयात तक्रारीही केल्या होत्या. पण त्यावेळी मात्र या यंत्रणांनी डोळेझाक केली.शेतकऱ्यांयांनी खासदार राजन विचारे, माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा यांच्याकडे व्यथा मांडली असता त्यांनीही तहसीलदारांना भराव प्रकरणी शेतकऱ्यांवर अन्याय झाला असून फसवून भराव करणाºया नगरसेवकांवर कारवाई करा असे म्हटले आहे. दरम्यान, विचारे व मेंडोन्सा यांनी शेतकऱ्यांची बाजू मांडल्यानंतर गुरूवारी मंडळ अधिकारी अनारे यांनी शेतकऱ्यांसोबत मातीच्या भरावाची पुन्हा पाहणी केली.या वेळी संतप्त शेतकऱ्यांनी जबाबामध्ये थेट भाजपाचे नगरसेवक जयेश भोईर, नयना म्हात्रे, सुरेश खंडेलवाल व गजानन म्हात्रे यांची नावे दिली आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. पालिकेच्या विकास आराखड्यातील रस्ता असल्याचे सांगून हा भराव केला. ७०० फूट लांब भराव केला असून हा भराव काढावा असे शेतकऱ्यांनी म्हटले आहे.केवळ राजकीय हेतूने आम्हा भाजपा नगरसेवकांची खोटी नावे दिली आहेत. हा आरोप करणाºयांची येथे जमीनच नाही. आम्ही ग्रामस्थांशी चर्चा करूनच पालिका विकास आराखड्यातील रस्त्यासाठी म्हणून भरावाची मान्यता घेतली होती. पालिकेने सर्व्हे करून रस्ता हद्दीचे खांब घातले आहेत. पण भराव आम्ही केलेला नाही. - जयेश भोईर, नगरसेवक, भाजपा
बेकायदा भरावामागे भाजपाचे नगरसेवक; शेतकऱ्यांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2019 5:18 AM