ठाणे : राष्ट्रवादीचे नेते सकाळी जे बोलतात तेच मुख्यमंत्री रात्री ठाण्यात बोलतात. याचाच अर्थ भाजपा आणि राष्ट्रवादीमध्ये अंडरस्टँडीग असल्याचे दिसत असून, ही एक अभद्र युती असल्याचा टोला ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत लगावला. भाजपाकडे प्रचाराचे मुद्देच नसल्याने ते राष्ट्रवादीच्या बाटलीतून दूध पित असल्याचीही टीका त्यांनी केली. भाजपा न केलेल्या कामांचे तर श्रेय घेत आहे. ती गाजर दाखविणारी टोळीच असल्याचेही ते म्हणाले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवा आणि उपवन येथे झालेल्या जाहीर सभांमध्ये केलेल्या अनेक दाव्यांचा आणि आरोपांचा समाचार घेतला. क्लस्टर डेव्हलपमेंट, मेट्रो, ठाण्यातील उड्डाणपूल, जलवाहतूक अशा अनेक कामांचे श्रेय मुख्यमंत्री स्वत:कडे घेत आहेत. परंतु, भाजपा सत्तेवर येण्यापूर्वीच यातील बहुतांश प्रकल्पांना मंजुरी मिळाली होती, याकडे त्यांनी लक्ष वेधले. क्लस्टर, मेट्रो, विस्तारित ठाणे स्थानक या प्रकल्पांसाठी कोणी प्रखर संघर्ष केला, हे ठाणेकरांना ठाऊक आहे. ठाण्यासाठी क्लस्टरचा निर्णय २८ फेब्रुवारी २०१४ रोजी झाला होता, त्यावेळी फडणवीस मुख्यमंत्री नव्हते. ठाण्यासाठी एसआरएचा मुद्दाही खोडून काढत ‘एसआरए’ची अधिसूचना ११ सप्टेंबर २०१४ रोजी निघाली होती याचे पुरावेच त्यांनी यावेळी सादर केले. शहरातील तीन उड्डाणपुलांच्या कामांच्या निविदा ठाणे महापालिकेने २०१४ च्या सप्टेंबर महिन्यात काढल्या असल्याची आठवण त्यांनी मुख्यमंत्र्यांना करुन दिली. त्यामुळे या तिन्ही प्रकल्पांचे श्रेय घेण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न जनतेची दिशाभूल करणारा असून भाजपा ही केवळ गाजर दाखविणाऱ्यांची टोळी असल्याचा टोला त्यांनी लगावला. आमच्या हाती सत्ता द्या डम्पींग बंद करुन दाखवितो हे मुख्यमंत्र्यांचे विधानदेखील हास्यास्पद असल्याचे ते म्हणाले. जीतेंद्र आव्हाड यांना डंपिंग, मलिन:सारण, पाणीपुरवठा आदी मुद्यांवरून शिवसेनेवर टीका करण्याचा अधिकार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ठाणे महापालिकेचे मलिन:सारण प्रकल्प कोपरी आणि मुंब्रा येथे सुरू असून विटावा, माजिवडा आणि कोलशेत येथील प्रकल्प प्रगतीपथावर आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. दिव्यातील डंपिंग बंद करण्याचा निर्णयही महापालिकेने यापूर्वीच घेतला असून शीळ येथे वनविभागाच्या जागेत कचऱ्यावरील प्रक्रिया प्रकल्प उभा राहाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ठाणेकरांसाठी हक्काचे धरण बांधण्याचा शिवसेनेचा निर्धार आहे. तशी तयारीही महापालिकेने काही वर्षांपूर्वीच सुरू केली होती. मात्र, तत्कालीन आघाडी सरकारनेच धरणाचा प्रकल्प ठाणे महापालिकेकडून काढून ‘एमएमआरडीए’कडे सोपवला होता. नंतर ‘एमएमआरडीए’ने निधी देण्यास असमर्थता दर्शवली. त्यावेळी आव्हाड का गप्प बसले, असा सवालही त्यांनी केला. (प्रतिनिधी)
भाजपा पिते राष्ट्रवादीच्या बाटलीतून दूध - शिंदे
By admin | Published: February 15, 2017 4:44 AM