ठाणे : मुंबईपाठोपाठ ठाणे जिल्ह्यात शिवसेनेला रोखण्याच्या खेळीत भाजप यशस्वी झाला आहे. मुंबईत मागीलवेळी एका जागेमुळे मोठा भाऊ ठरलेल्या भाजपने यावेळी १६ जागांवर यश मिळवले, तर शिवसेनेची गाडी १२ जागांवर अडखळली.
ठाणे जिल्ह्यात शिवसेनेला रोखण्याकरिता भाजपने आपले बंडखोर रिंगणात उतरवले होते. त्या खेळीला मीरा-भार्इंदरमध्ये यश लाभले. मात्र, कल्याण पश्चिम मतदारसंघात नरेंद्र पवार यांच्या बंडातील हवा निघून गेल्यामुळे भाजपला ठाणे जिल्ह्यात दोन अंकी संख्याबळ गाठता आले नाही. त्याचवेळी शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वाच्या उमेदवार बदलण्याच्या निर्णयामुळे दोन जागांवर शिवसेनेला फटका बसला. कल्याण पश्चिमची जागा भाजप बंडखोराने जिंकली असती, तर शिवसेनेला जेमतेम चार जागांवर समाधान मानावे लागले असते.
भाजपला पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यात फटका बसेल, याचा अंदाज पक्षाच्या धुरिणांना आला होता. त्यामुळे मुंबई व ठाण्यात शिवसेनेला रोखण्याचा प्रयत्न भाजपने युती करूनही सुरू केला होता. मुंबईत भाजप व शिवसेनेतील जागांचे अंतर गतवेळी केवळ एका जागेचे होते. यावेळी ते चार जागांचे झाले. ठाणे जिल्ह्यात मागीलवेळी भाजपच्या जागा सात, तर शिवसेनेच्या सहा जागा होत्या. अपक्ष आमदार गणपत गायकवाड हे भाजपचे सहयोगी सदस्य होते. यावेळी गायकवाड यांनी भाजपचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती.
सेनेबरोबर युती करताना ऐरोलीच्या बदल्यात भाजपने सेनेला कल्याण पश्चिम देऊ केले. मात्र, तेथील विद्यमान आ. नरेंद्र पवार यांनी बंड केले. ते बंड शमवणे भाजपला अशक्य नव्हते. त्याचबरोबर मीरा-भार्इंदरमध्ये विद्यमान आ. नरेंद्र मेहता यांच्याविरोधात बंडखोरी करणाऱ्या गीता जैन यांनाही खाली बसवणे अशक्य नव्हते. मात्र, शिवसेनेला रोखण्याकरिताच की काय, भाजपने बंडखोर रिंगणात ठेवल्याचे आता बोलले जाऊ लागले आहे. त्यापैकी गीता जैन या विजयी झाल्याने मीरा-भार्इंदरमध्ये भाजपचे काडीमात्र नुकसान झाले नाही. मेहता यांच्या पराभवाची कुणकुण लागल्यानेच जैन यांची बंडखोरी टिकवली गेल्याची चर्चा आहे.
सेनेचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आग्रहाखातर कल्याण ग्रामीणमध्ये सुभाष भोईर यांचे तिकीट कापून रमेश म्हात्रे यांना संधी दिली गेली. तेथे सेनेला फटका बसला. राष्ट्रवादीतून बरोरा यांना आयात करून दौलत दरोडा यांना संधी नाकारण्याचा निर्णयही सेनेच्या अंगलट आला. भिवंडी पूर्व मतदारसंघात सेनेचे रूपेश म्हात्रे हे पराभूत झाले. तेथील भाजप शहराध्यक्ष संतोष शेट्टी यांचे पक्षांतर आणि मनसेच्या उमेदवारीचा फटका सेनेला बसला.
आयलानींचा निसटता विजय, कथोरेंना मोठा लीड
जिल्ह्यात विजयी झालेल्या १८ आमदारांपैकी सर्वाधिक एक लाख ७४ हजार ६८ मते घेऊन किसन कथोरे हे त्यांच्या मुरबाड मतदारसंघातून पुन्हा विजयी झाले. त्यांनी प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रमोद हिंदुराव यांचा पराभव केला. हिंदुराव यांना ३८ हजार २८ मते मिळाली आहे. महत्त्वाचे म्हणजे, कथोरे यांच्या विरोधातील सर्वच उमेदवारांचे डिपॉझीट जप्त झाले.
जिल्ह्यातील सर्व मतदारसंघांचा आढावा घेता, या निवडणुकीत सर्वात कमी मतांनी उल्हासनगर मतदारसंघातून कुमार आयलानी यांचा विजय झाल्याचे दिसते. ते दोन हजार चार मतांनी विजयी झाले. कुमार आयलानी यांना ४३ हजार ६६६ मते मिळाली, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान आमदार ज्योती कलानी यांना ४१ हजार ६६२ मते मिळाली.