लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली/ठाणे : काँग्रेसप्रणित यूपीए सरकारने त्यांच्या दहा वर्षांच्या काळात महाराष्ट्राला जेवढी मदत दिली नाही, त्यापेक्षा कित्येक पट अधिक मदत मोदी सरकारने दिली. रेल्वे, रस्ते, मेट्रो प्रकल्प अशा सर्वच विकास कामांकरिता केंद्र सरकार सढळ हस्ते राज्यातील भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या सरकारसाठी सहकार्य केल्याचा दावा केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी मंगळवारी केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राज्यातील सरकार कोसळण्यासाठी विरोधक देव पाण्यात घालून बसले आहेत. मात्र, त्यांच्या पदरी निराशा येणार असून, हे सरकार आणखी ताकदीने महाराष्ट्राचा विकास करेल, असा विश्वास ठाकूर यांनी व्यक्त केला. कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या दुसऱ्यांदा दौऱ्यावर मंगळवारी ठाकूर आले. देशाच्या प्रगतीमध्ये मोदी सरकारचे मोठे योगदान असून, मजबूत देशासाठी मोदी यांची पुन्हा गरज असल्याचे ते म्हणाले.
कळवा येथे जोरदार शक्तिप्रदर्शन कल्याण लोकसभा मतदारसंघात बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप आम्ही एकत्रित अधिक लक्ष देऊन निवडणूक लढू. तसेच यापूर्वी मिळालेल्या यशापेक्षा अधिक मतांनी विजय प्राप्त करण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी आ. प्रवीण दरेकर, आ. संजय केळकर, आ. गणपत गायकवाड, आ. कुमार आयलानी यांच्यासह जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, सचिव गुलाब करंजुले, माजी आमदार नरेंद्र पवार, माजी उपमहापौर राहुल दामले आदी उपस्थित होते. कल्याण लोकसभा प्रवास योजनेच्या द्वितीय पर्वात कल्याण लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या संघटनात्मक स्थितीचा आढावा घेण्यासाठी ठाकूर यांचे कळवा येथे मंगळवारी सकाळी आगमन झाले. ढोल-ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले. कळवा येथे जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले.