ठाणे : स्कायवॉकच्या उभारणीच्या निमित्ताने शिवसेना निवडणुकीसाठी फंड गोळा करीत असल्याच्या ठाणे महापालिकेतील भाजपचे गटनेते मनोहर डुंबरे यांच्या विधानामुळे ते चांगलेच अडचणीत आले आहेत. डुंबरे यांच्या या विधानानंतर शिवसेनेच्या नगरसेवकांनी व मुख्यत्वे महिला कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत गनिमी काव्याने डुंबरे यांच्या दालनात घुसून त्यांना घेराव घातला. त्यांनी केलेल्या विधानाचा थेट जाब विचारत डुंबरे यांनी शिवसेनेची आणि महापौरांची माफी मागावी, अशी मागणी केली. अखेर सात दिवसांत खुलासा करतो, असे डुंबरे यांनी सांगिल्यानंतर संतप्त शिवसैनिकांनी त्यांचे दालन सोडले.
यापूर्वी कोट्यवधींचा खर्च करून बांधण्यात आलेले स्कायवॉक काढण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली असताना आणखी तीन स्कायवॉकवर कोट्यवधींचा खर्च करण्याचा घाट ठाणे महापालिका प्रशासनाने घातला आहे. घोडबंदर येथे दोन, तर कॅडबरी येथे तीन स्कायवॉक बांधण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला असून यासाठी १३ कोटींचा खर्च केला जाणार आहे. या स्कायवॉकच्या उभारणीला भाजपचे डुंबरे तसेच मनसेच्या वतीने आक्षेप घेतला होता. डुंबरे यांनी थेट शिवसेनेवर हल्लाबोल करताना स्कायवॉक उभारणीतून शिवसेना निवडणुकीचा फंड गोळा करत असल्याचा आरोप केला. यामुळे शिवसेनेचे नगरसेवक कमालीचे आक्रमक झाले. दुपारी ४ च्या दरम्यान गनिमी काव्याने डुंबरे यांच्या कार्यालयात घुसले. यावेळी नगरसेविका राधिका फाटक, मीनल संख्ये, विमल भोईर, सिद्धार्थ ओलवळेकर, विकास रेपाळे, दिलीप बारटक्के, सुधीर कोकाटे आणि शंभरहून अधिक महिला कार्यकर्त्यांनी डुंबरे यांच्या दालनात घुसून शिवसेनेची आणि महापौरांची जाहीर माफी मागा, अशी मागणी करीत जोरदार घोषणाबाजी केली. स्कायवॉकची महिलांची तसेच नागरिकांची मागणी असताना तुम्ही असे विधान कसे करू शकता, असा प्रश्न नगरसेवकांनी केला.
सुमारे तासभर हे आंदोलन सुरू होते. अखेर यावर योग्य तो खुलासा आठवड्याभरात देण्याचे आश्वासन डुंबरे यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे डुंबरे भांबावून गेले होते. आंदोलनामुळे वातावरण चिघळू नये यासाठी काही वेळाने पालिका मुख्यालयात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. स्कायवॉकचे काम होणारच, हिंमत असेल तर काम बंद करून दाखवा, असा इशारा शिवसेना नगरसेवकांनी दिला.
...........
शिवसेनेकडूनच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन
आंदोलनाच्या वेळी शंभरहून अधिक महिला कार्यकर्त्यांनी भाजपच्या गटनेत्याच्या कार्यालयात मोठी गर्दी केली होती. गर्दीत अनेकांना गुदमरायला झाले. ठाण्यात कोरोना वाढला असताना सत्ताधारी शिवसेनेकडूनच या आंदोलनाच्या माध्यमातून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला.
............
भाजपच्या प्रभाग सुधारणा निधीवर येणार गंडांतर
भाजप गटनेत्याने केलेल्या आरोपाविरुद्ध केवळ आंदोलन करून शिवसेना गप्प बसणार नाही, तर भाजप नगरसेवकांच्या प्रभाग सुधारणा निधीवर गंडांतर येण्याची चिन्हे आहेत, असे संकेत शिवसेनेच्या गोटातून देण्यात आले.
............
डुंबरे पडले एकटे
शिवसेनेच्या या आंदोलनादरम्यान डुंबरे यांचा बाजूने भाजपचा एकही नगरसेवक धावून आला नाही. शिवसेनेने आंदोलन अचानक केले असले तरी एक तासभर सुरू होते. मात्र, भाजपचा एकही नगरसेवक डुंबरे यांच्या बचावाकरिता फिरकला नाही.
............
दबाव खपवून घेणार नाही
मी माझ्या पक्षाची भूमिका मांडली असून शिवसेनेने कोणत्याही प्रकारचा दबाव टाकला तरी मी दबाव खपवून घेणार नाही. कोरोनाचा कहर सुरू असताना स्कायवॉकच्या कामांची घाई नको. ती नंतरदेखील होऊ शकतात. यासाठी कोट्यवधींचा खर्च कशाला करायला हवा. ठाण्यात सत्ता शिवसेनेची असल्यामुळे तेच या सर्व गोष्टींना जबाबदार आहेत. पक्ष माझ्या बाजूने उभा आहे. या संदर्भात महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त यांना निवेदन देण्यात आले असून सुरक्षेत वाढ करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. कोरोनाच्या कारणास्तव प्रशासन महासभा घेत नाही. मात्र, एकट्या भाजप पदाधिकाऱ्याला घेरण्यासाठी १५० सत्ताधारी शिवसेनेचे कार्यकर्ते एकत्र येतात, तर त्यामुळे कोरोना नियमांचे उल्लंघन होत नाही का? त्यामुळे आंदोलक शिवसैनिकांवर कारवाई करावी.
- मनोहर डुंबरे,गटनेते, भाजप
............
वाचली