- राजू काळेभाईंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेत सत्ता भाजपाची तर विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेकडे, अशी स्थिती निर्माण झाल्यावर चार मजली महापालिका मुख्यालयातील दुस-या मजल्यावरील विरोधी पक्षनेत्याचे दालन तळमजल्यावर हलवून भाजपाने आपल्या जुन्या मित्राला ‘पायरी’ दाखवल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरु झाली आहे.भाजपाची सत्ता येताच मुख्यालयातील दालनांच्या सुशोभिकरणाचे व अंतर्गत बदलाचे वारे वाहू लागले आहेत. मागील महापालिकेत भाजपा व शिवसेना हे दोघे सत्ताधारी होते. त्यावेळी मुख्यालयातील विरोधी पक्ष नेत्याचे दालन दुसºया मजल्यावर होते. आता विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेकडे येताच विरोधी पक्षनेत्याचे दालन थेट तळमजल्यावर स्थलांतर करीत भाजपाने सेनेला चांगलाच धक्का दिल्याचे बोलले जात आहे. भाजपाच्या या कुटनितीने शिवसेनेचे नेते नाराज असून भाजपाचे नेते हेतूत: दुजाभाव करुन अपमानित करीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. भाजपाने २०१५ मध्ये सत्तांतरासाठी शिवसेनेशी युती करुन काँग्रेस-राष्टÑवादीची सत्ता उलथून टाकली. तत्पूर्वी आघाडीच्या सत्ताकाळात सेना-भाजपाने विरोधी पक्षाची भूमिका वठवली होती. भाजपाने यंदाच्या निवडणुकीत बहुमत मिळवल्याने सेनेला सोडचिठ्ठी दिली. संख्याबळानुसार विरोधी पक्षातील मोठा पक्ष हा शिवसेना असल्याने विरोधी पक्षनेतेपदावर याच पक्षाचा दावा असणार आहे. या पदासाठी सेनेने १६ आॅक्टोबरच्या विशेष महासभेत नगरसेवक राजू भोईर यांच्या नावाची शिफारस महापौरांकडे केली. महापौर डिंपल मेहता यांनी त्याचीही अजून घोषणा केलेली नाही. मात्र त्याच महासभेत भाजपाने पालिका मुख्यालयाच्या तळमजल्यावरील गटनेत्यांच्या दालनांचे नुतनीकरण करण्याचा ठराव बहुमताच्या जोरावर मंजूर केला. तत्पूर्वी तळमजल्यावरील गटनेत्यांच्या दालनाचे मोजमाप करण्यात आले. त्याच्या नुतनीकरणाचा आराखडा महापौरांना सादर करण्यात आला. त्यात मुख्यालयातील दुसºया मजल्यावरील विरोधी पक्ष नेत्याचे दालन गटनेत्यांच्या दालनालगत तळमजल्यावर स्थलांतरीत करण्यात येणार असल्याचे नमूद केले आहे. महासभेत शिवसेना व काँग्रेसने भाजपाच्या या मनसुब्याला तीव्र विरोध केला होता. परंतु, बहुमताअभावी त्यांचा विरोध कुचकामी ठरला.मुख्यालयातील दुसºया मजल्यावर महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, सभागृह नेता व आयुक्त यांच्या दालनाबरोबर विरोधी पक्षनेत्याचे दालन होते. आयुक्तांना सर्व प्रमुख पदाधिकाºयांशी संपर्क साधणे सोपे व्हावे याकरिता ही सर्व दालने एकाच मजल्यावर होती. परंतु, भाजपाने सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाºयांच्या कारभारात विरोधी पक्ष नेत्याची व त्याला भेटायला येणाºया समर्थकांची लुडबुड नको म्हणून गटनेत्यांसोबत विरोधी पक्षनेत्याची गठडी वळून त्याला तळमजल्यावर भिरकावल्याची भावना शिवसैनिक व्यक्त करीत आहेत.
मीरा रोड-भार्इंदरमध्ये भाजपाने शिवसेनेला दाखवली ‘पायरी’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2017 5:17 AM