ठाणे : ठाणे जिल्ह्यातील १८ मतदारसंघांतील एकूण ३७२ पैकी ४७ अर्ज बाद ठरवण्यात आले असून २३९ अर्ज वैध ठरले आहेत. कल्याण ग्रामीण मतदारसंघातून उमेदवारी दाखल केलेले सुभाष भोईर हे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार रमेश म्हात्रे यांच्याकरिता माघार घेण्याच्या पवित्र्यात आहेत. कल्याण पश्चिम मतदारसंघातून बंडखोरीचा पवित्रा घेणारे नरेंद्र पवार यांचा अर्ज वैध ठरल्याने आता त्यांचे बंड शमवण्यात भाजपला यश येते किंवा कसे, याकडे लक्ष लागले आहे. मीरा-भाईंदरमध्ये गीता जैन यांनीही भाजपच्या नरेंद्र मेहता यांच्या विरोधात बंडाचा झेंडा उभारला आहे. उल्हासनगरात ज्योती व ओमी कलानी या दोघांचेही अर्ज वैध ठरल्याने आता बहुदा ज्योती या माघार घेतील व ओमी हेच भाजपच्या आयलानी यांना आव्हान देतील, अशी शक्यता आहे.कल्याण ग्रामीणमध्ये रमेश म्हात्रे हेच शिवसेनेचे अधिकृत उमेदवार असल्याचे शनिवारी स्पष्ट झाले. सुभाष भोईर यांनी अपक्ष या नात्याने दाखल केलेला अर्ज वैध ठरला असला तरी भोईर यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर माघारीची तयारी दर्शवली असल्याने या मतदारसंघातील सेनेचे बंड थंड होण्याचे संकेत प्राप्त झाले. कल्याण पश्चिमेत शिवसेनेच्या विश्वनाथ भोईर यांच्या विरोधात भाजपचे नरेंद्र पवार यांनी दाखल केलेला अर्ज छाननीत वैध ठरला. आता पवार यांच्या माघारीकरिता सत्ताधारी युती काय करते व पवार त्या प्रयत्नांना किती दाद देतात हे पाहणे औत्सुक्याचे आहे.बंडाचा पवित्रा कायम ठेवणार?मीरा-भार्इंदरमधील भाजपच्या बंडखोर गीता जैन यांनी आ. नरेंद्र मेहता यांच्याशी सातत सुरू असलेल्या संघर्षातून हे पाऊल उचलले आहे. आता त्यांचाही अर्ज वैध ठरल्यावर त्या वरिष्ठांच्या दबावाला बळी पडतात की, बंडाचा पवित्रा कायम ठेवतात, याबाबत तर्कवितर्क केले जात आहेत. उल्हासनगरमध्ये ओमी कलानी हेच भाजपच्या कुमार आयलानी यांना आव्हान देतील, अशी शक्यता आहे. ओमी व ज्योती यांच्या अर्जावर आक्षेप घेतल्याने छाननी प्रक्रिया स्थगित करावी लागली. मात्र, दोघांचेही अर्ज वैध ठरले.
भाजपची डोकेदुखी कायम; नरेंद्र पवार, गीता जैन, ओमी कलानी यांचे अर्ज वैध
By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2019 2:05 AM