अजित मांडके
ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा जागांवर शिंदेसेना आणि भाजपचा बोलबाला असून १८ पैकी १६ जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले. भाजपचा स्ट्राइक रेट १०० टक्के, तर शिंदेसेनेचा स्ट्राइक रेट ९० टक्के आहे. त्यामुळे आता भाजपच ठाणे जिल्ह्यात मोठा भाऊ आहे. ठाणे जिल्हा हा उद्धवसेनेचा नव्हे तर शिंदेसेनेचा बालेकिल्ला आहे हेही अधोरेखित झाले. मागील महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदे यांनी एकहाती सत्ता प्राप्त केली. यावेळी आता महायुतीत असलेल्या शिंदे यांना भाजपबरोबर युती करावी लागेल का आणि विधानसभेत मोठा भाऊ झालेल्या भाजपला जागा सोडाव्या लागतील का, असे प्रश्न भविष्यातील राजकारणाच्या उदरात दडले आहेत.
ठाणे जिल्ह्यात भाजप हा गेल्या वेळेसही मोठा भाऊ ठरला होता. भाजपने नऊ जागा लढवल्या होत्या. त्यातील आठ जागांवर त्यांना यश मिळाले होते, तर शिवसेनेला ९ पैकी ५ जागांवर यश आले होते. त्यामुळे भाजपच शिवसेनेवर भारी ठरल्याचे दिसून आले. या विधानसभा निवडणुकीतही भाजपने १०० टक्के स्ट्राइक रेट ठेवून जिल्ह्यावर आपला वरचष्मा कायम ठेवला. गेल्या वेळेच्या तुलनेत भाजपची एक जागा वाढली, शिवसेना फुटल्यानंतर जिल्ह्यात शिंदेसेनेला आपली ताकद दाखविण्याची किंबहुना ठाणे जिल्हा हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाच बालेकिल्ला असल्याने ही निवडणूक त्यांच्यासाठीही तितकीच महत्त्वाची होती. शिंदेसेनेने सात जागा लढवल्या होत्या. त्यातील भिवंडी पूर्वची जागा वगळता शिंदेसेनेने सहा जागांवर विजय मिळविला. गेल्या वेळच्या तुलनेत त्यातही शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदेसेनेने एक अतिरिक्त जागा मिळवली. त्यामुळे शिंदेसेनाही जिल्ह्यात वरचढ ठरली.
निवडणुकीच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा पिंजून काढला होता. भाजप नेते फारसे जिल्ह्यातील आपल्या उमेदवारांसाठी फिरले नाहीत. मात्र, शिंदे यांनी भाजपच्या उमेदवारांसाठीही सभा घेतल्या, तसेच आपल्या पक्षातील प्रत्येक माजी नगरसेवकासह पदाधिकाऱ्यांनाही ही निवडणूक म्हणजे तुमची पालिकेची परीक्षा असल्याचे सांगितले होते. या निवडणुकीचे रिपोर्ट कार्ड तुमचे पालिकेचे भवितव्य ठरविणारी आहे, अशी ताकीदच दिली होती. त्यामुळेच त्यांचे माजी नगरसेवकही महायुतीच्या उमेदवारांसाठी मोठ्या जिद्दीने प्रचारात उतरले होते. त्याचे फलित म्हणजे ठाणे जिल्ह्यातील १८ पैकी १६ जागांवर महायुतीला मिळालेला विजय.
महायुतीला भक्कम बहुमत मिळाल्याने आता या अनुकूल वातावरणात मुंबई, ठाणे यासह विविध महापालिकांच्या निवडणुका सरकार लवकर घेईल. मागील महापालिका निवडणुकीत शिवसेना व भाजपमध्ये संघर्ष दिसला. ठाण्यातील जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी ठाण्यातील नोकरशहा महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने कसा राजकीय हस्तक्षेप करीत आहेत, अशी नाराजी प्रकट केली होती. तेव्हाही भाजप-शिवसेना युती होती. परंतु उद्धव यांचा भाजपसोबत संघर्ष सुरू होता. निकाल लागले तेव्हा एकनाथ शिंदे यांनी स्वबळावर महापालिका जिंकली. स्व. आनंद दिघे यांच्या काळातही शिवसेनेला स्वबळावर महापालिका जिंकता आली नव्हती. ती किमया शिंदे यांनी केली. मागील सरकारचे मुख्यमंत्री शिंदे होते. आता शिंदे यांना भाजपसोबत युती करावी लागेल. अशा परिस्थितीत भाजपने विधानसभेच्या जास्त जागा जिंकल्या असल्याने भाजपने जिंकलेल्या विधानसभा मतदारसंघातील महापालिका जागांवर भाजपचे स्थानिक नेते दावा करतील, अशी शक्यता आहे. अशा परिस्थितीत शिंदे कोणती भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे.