नितिन पंडीत
भिवंडी - शहरातील वाहतुकीची वर्दळ वाढलेली असताना तत्कालीन युती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर करून भूमिपूजन केलेल्या कल्याण नाका ते साईबाबा या रस्त्यावरील उड्डाणपूल पूर्ण झाला असताना उद्घाटनावरून शिवसेना-भाजप या दोन राजकीय पक्षात श्रेयवादाची लढाई सुरू झाली. येत्या सोमवारी या उड्डाणपुलाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाईन लोकार्पण करणार होते. मात्र असे असतानाच शनिवारी भाजपा आमदार महेश चौघुले व शहराध्यक्ष संतोष शेट्टी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह उड्डाणपुलावर नारळ वाढवून लोकार्पण करीत वाहनांना झेंडा दाखवीत हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला केला. श्रेयवादाच्या या लढाईत आता दोन्ही पक्षात चांगलीच जुंपली आहे.
शहरातील या उड्डाणपुलाच्या उभारणीसाठी आम्ही मागणी करीत असताना तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे योगदान मोठे असून त्यांनी या उड्डाणपुलास मंजुरी देऊन भूमिपूजन केले होते. असे असताना स्थानिक आमदारांना डावलून एमएमआरडीए या पुलाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करणार आहेत. कोरोना काळात बाहेर न पडलेले मुख्यमंत्री यांना दीड महिन्यापासून तयार असलेल्या उड्डाणपुलाच्या उदघाटनासाठी वेळ मिळाला नाही त्यामुळे येथील नागरीकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत असून कोरोनासाठी वेळ नसलेल्या मुख्यमंत्र्यांना ऑनलाईन लोकार्पणासाठी ही वेळ मिळू शकला नसल्याने आम्ही उड्डाणपुलाचे लोकार्पण भिवंडीकर जनतेसाठी केले असून सेना सरकार जाणून बुजून नागरिकांना वेठीस धरत असल्याचा आरोप यावेळी आमदार महेश चौघुले यांनी केला आहे.
दरम्यान हा उड्डाणपूल सुरवातीपासूनच श्रेयवादाने वादग्रस्त ठरला असून सुरुवातीला भूमिपूजन सोहळ्यावर शिवसेनेने बहिष्कार टाकला होता. 2019 मधील विधानसभा निवडणुकीनंतर समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी या उड्डाणपुलावरील एक मार्गिका सुरू करण्यासाठी खटाटोप सुरू करताच त्याची कुणकुण लागताच शिवसेनेचे माजी आमदार रुपेश म्हात्रे यांनी या उड्डाणपुलाचे लोकार्पण करून श्रेय घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर आज भाजपाने या उड्डाणपुलाचे लोकार्पण करून या उड्डाणपुलाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना प्रथमच भिवंडी शहराच्या विकासासाठी कोट्यवधी रुपये मंजूर केले परंतु त्यामधील सुरू असलेल्या कामांना शिवसेना सरकार स्थगिती देऊन भिवंडीकर नागरिकांवर अन्याय करीत असल्याने या उड्डाणपुलाचे खरे श्रेय माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना असल्याने या उड्डाणपुलाचे लोकार्पण भाजपाने केले अशी प्रतिक्रिया भाजपा शहर अध्यक्ष संतोष शेट्टी यांनी दिली आहे.