- धीरज परबमीरा रोड : मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे नेते मुझफ्फर हुसेन, भाजपचे नरेंद्र मेहता व अपक्ष उमेदवार गीता जैन यांच्यात तिरंगी लढत आहे. तिघेही मातब्बर उमेदवार आहेत. परंतु, या मतदारसंघात लढतीची चर्चा आहे ती जैन व मेहता यांच्यातली.
उमेदवारी मिळवण्यासाठी जैन व मेहतांमध्ये जोरदार चुरस होती. पण, मेहता हे मुख्यमंत्र्यांच्या जवळचे असल्याने मुख्यमंत्र्यांनी प्रतिष्ठा करून त्यांची उमेदवारी मिळवली. तर, उमेदवारी न मिळाल्याने जैन यांनी अपेक्षेप्रमाणे बंडखोरी केली. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मोदीलाटेत मेहता हे निवडून आले. त्यांनी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा यांचा ३२ हजार मतांनी पराभव केला होता. काँग्रेसची संघटना पूर्वीसारखी शहरात बळकट नसली, तरी मुझफ्फर हे नगर परिषद काळापासून राजकारणात व समाजकारणात आहेत.
शहराच्या आजपर्यंतच्या विकासात व योजनांमध्ये मुझफ्फर यांचे योगदान नाकारून चालणार नाही. शहरातील राजकारणाचा आणि समस्यांचा त्यांचा अभ्यास आहे. या मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराने बंडखोरी केल्यामुळे येथील लढत चुरशीची होणार आहे. राज्यातील ज्या काही निकालांकडे लक्ष लागले आहे, त्याच या मतदारसंघाचा निश्चितच समावेश आहे, असे राजकीय निरीक्षकांकडून सांगण्यात आले.
जमेच्या बाजू
मतदारसंघात भाजपचे ४२ नगरसेवक आहेत. शिवाय शिवसेना, काँग्रेस व काँग्रेस समर्थक प्रत्येकी एक असे तीन नगरसेवक सोबत आहेत. भाजपची संघटना असून पदाधिकारी, कार्यकर्ते आहेत. मतदारनोंदणीपासून पक्षबांधणी तसेच विधानसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव, नियोजन आहे. स्थानिक पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारीच नव्हे, तर महापालिका, पोलीस, महसूल आदी विभागांवर चांगली पकड आहे.
माजी महापौर असतानाच्या त्यांच्या कारकिर्दीत ७५ दशलक्ष लीटरची पाणीपुरवठा योजना सुरू होऊन शहरातील नागरिकांना नवीन नळजोडण्या देण्याची सुरूवात झाली. मीरा-भार्इंदर मेट्रोच्या कामाची घोषणा मुख्यमंत्र्यांनी जैन या महापौर असताना त्यांच्या मागणीवरून पालिका कार्यक्रमात केली होती. आरोप वा वादात नसणाऱ्या जैन यांची नागरिकांमध्ये व्यक्तिगत प्रतिमा चांगली आहे. महिलांसाठी उपक्रम राबविले.
उणे बाजू
शिवसेना आणि स्थानिक नेते, नगरसेवकांशी सतत घेतलेला पंगा, दाखल असलेले २१ फौजदारी गुन्हे, लोकायुक्तांनी चालवलेली बेनामी संपत्ती प्रकरणातील चौकशी, आरक्षणांचा गैरवापर, टीडीआर व यूएलसी गैरप्रकाराच्या तक्रारी, सेव्हन इलेव्हन कंपनीच्या माध्यमातून घेतलेली आर्थिक भरारी आदी कारणांनी मेहता वादाच्या भोवºयात राहिले आहेत. मर्जीप्रमाणे कामकाज करतात. २०१४ मधील आश्वासनांची पूर्तता केली नाही.
नागरिकांमध्ये चांगली चर्चा असली, तरी निवडणुकीसाठी लागणारे पक्ष संघटन नाही. त्यामुळे मतदार याद्यांपासून चांगले पोलिंग एजंट नियुक्त करण्यासाठी मेहनत घ्यावी लागणार. बॅट हे चिन्ह नागरिकांपर्यंत पोहोचवणे आणि मतदानयंत्रांवर असलेले स्थान सांगण्यासाठी घराघरांत पोहोचण्याची गरज आहे. सत्ताधारी भाजप उमेदवारासमोर बंडखोरी केल्याने प्रशासकीय यंत्रणा त्यांच्या तक्रारींवर सहकार्य करतील, याची साशंकता आहे.