लोकमत न्यूज नेटवर्कठाणे/बदलापूर : ठाणे विभाग हा भारतीय जनता पक्षासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या विभागामध्ये आपले काम सातत्याने वाढत असून भविष्यात वाढणार असल्याने येथे सुसज्ज कार्यालय आवश्यक होते. या विभागामध्ये भाजप हा एक प्रमुख पक्ष असून येथील जनता अतिशय ताकदीने आपल्या पाठीशी उभी असल्याने निवडणुकांमध्ये यश मिळत आहे, असे सूचक विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी ठाण्यात केले.
ठाणे येथील रेमंड मैदान परिसरात भाजपने दुमजली प्रशस्त ठाणे विभागीय कार्यालय उभारले आहे. त्याचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, आ. संजय केळकर, गणेश नाईक, निरंजन डावखरे, जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, ठाण्यात मित्रपक्ष वारंवार आपल्यासोबत राहिलेले आहेत. भाजपचे काम याठिकाणी मजबुतीने वाढताना दिसून असून आजच्या घडीला ठाणे विभागामध्ये भाजप हा एक प्रमुख पक्ष आहे. ठाणे विभागातील जनता आपल्या पाठीशी उभी आहे. ठाणे विभागामध्ये आपले काम हे सातत्याने वाढत असून भविष्यात ते वाढणार असल्याने येथे सुसज्ज कार्यालय आवश्यक होते.
कोणत्याही दानातून हे कार्यालय उभारण्यात आलेले नसून त्याची वाजवी किंमत देण्यात आली आहे. इतर पक्षातील लोक स्वत:ची मालमत्ता करण्याचे काम करतात पण, भाजपचे लोक पक्षाची मालमत्ता करण्याचे काम करतात, असे त्यांनी नमूद केले.
मोदींचे महिलांसाठी उल्लेखनीय कामबदलापूरमध्ये आमदार किसन कथोरे यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी फडणवीस यांनी मोदींनी महिलांसाठी केलेले काम उल्लेखनीय असून यापुढे राजकीय व्यासपीठावर ३३ टक्के खुर्च्या महिलांसाठी रिकाम्या ठेवाव्या लागतील, असे त्यांनी सांगितले. मोदींच्या नेतृत्वाखाली वर्षाला ११ लाख कोटी रुपये खर्च केले जात आहेत. मुख्यमंत्री शिंदे हे बदलापूरपर्यंत मेट्रो रेल्वे नक्कीच आणतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.