नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी: भिवंडी तालुक्यातील १४ ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा पक्षाने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे.१४ पैकी आठ जागांवर भाजपाचे सरपंच निवडून आले असून चार ठिकाणी बाळासाहेबांची शिवसेना या शिंदे गटाने बाजी मारली आहे.तर ठाकरे गटाला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.तर एका ठिकाणी अपक्ष उमेदवार निवडून आले असून या ग्राम पंचायत निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांना एकही जागा मिळवता आली नसल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीची पाटी कोरीच राहिली आहे.
कामतघर येथील वऱ्हाळ देवी मंगल कार्यालयात मंगळवारी सकाळी नऊ वाजता तहसीलदार अधिक पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली मतमोजणीस सुरवात झाली.या निवडणुकीत बहुतांश ठिकाणी भाजपा विरोधात शिंदे गट असेच समीकरण होते.त्यामुळे या ग्राम पंचायती निवडणुका केंद्रीय पंचायती राजमंत्री कपिल पाटील यांच्यासाठी प्रतिष्ठेची ठरली होती.विशेष म्हणजे पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीत महत्वाची असलेल्या कोनग्रामपंचयात निवडणुकीत भाजपने शिंदे गटाच्या उमेदवाराचा दारुण पराभव केल्याने पाटील यांनी कोनगावावर पुन्हा आपली पकड घट्ट केली असून या ठिकाणी भाजपच्या रेखा सदाशिव पाटील या विजय झाल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावर पसरले आहे.तर भाजपमधून बंडखोरी करीत शिंदे गटाशी हात मिळवणी केलेल्या डॉ रुपाली अमोल कराळे यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे.त्यामुळे भाजप व शिंदे गटासाठी प्रतिष्ठेची समजली जाणाऱ्या कोनग्रामपंचायत निवडणुकीत अखेर भाजपने आपले वर्चस्व निर्विवाद सिद्ध केले आहे तर कशेळी ग्राम पंचायतीवर मागील वीस वर्षांपासून शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष देवानंद थळे यांनी आपली विजयी परंपरा कायम ठेवली असून त्यांची पत्नी वैशाली देवानंद थळे या विजयी झाल्या आहेत.
कोन ग्राम पंचायतीबरोबरच तालुक्यातील कोपर,कारीवली,कांबे,दुगाड,आमने,आवळे-विश्वगड,सापे अशा एकूण आठ ग्राम पंचायतींवर भाजप विजयी झाली असून कोपर हेमंत घरत,कारीवली संजीव नाईक,कांबे भारती भोईर, दुगाड प्रेम प्रकाश मुकणे,आमणे शिशुपाल केणे, आवळा-विश्वगड प्रीती पवन देसले,सापे गोरख सुतारअसे आठ उमेदवार विजयी झाले आहेत.तर अकलोली ग्राम पंचयातीवर अपक्ष स्थानिक ग्राम समितीने यश मिळविला असून संचित सचिन म्हसकर या विजयी झाल्या आहेत.तर कशेळी,खानिवली,कासने,खालींग या चार ग्राम पंचायतींवर शिंदे गट विजयी झाला आहे.कशेळी ग्रामपंचायतीवर वैशाली देवानंद थळे,खानिवली निकिता राहुल दळवी,कासणे भगवान भोईर व खालींग राजाराम शेलार असे शिंदे गटाचे चार सरपंच विजयी झाले आहेत.तर उद्धव ठाकरे गटाला कुहे या एकमात्र ग्राम पंचायतीवर विजय मिळविता आला असून अजय आहेडा हे विजयी झाले आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"