लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात अंतरीम अर्थसंकल्प सादर करण्यात आला.महायुती सरकारने सादर केलेल्या राज्याच्या या अर्थसंकल्पात अल्पसंख्याकांसाठी किंवा वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी भरीव काहीही दिलेले नाही.
अल्पसंख्याक समाजासाठी कोणत्याही नवीन योजना या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलेली नाही.अर्थसंकल्पात अल्पसंख्याकांची एवढी मोठी निराशा कधीच झाली नाही. लोकसभा निवडणुकीच्या निकालासाठी भाजप अल्पसंख्याकांना शिक्षा करत असल्याचे दिसते अशी प्रतिक्रिया व आरोप भिवंडी पूर्वचे समाजवादी पार्टीच्या आमदार रईस शेख यांनी राज्य सरकारवर केले आहेत.या अर्थसंकल्पातील सर्व घोषणा या जुन्याच घोषणा आहेत त्या नव्याने मांडल्या आहेत. अल्पसंख्याकांच्या महत्त्वाच्या विषयांकडे या अर्थसंकल्पात पूर्णपणे दुर्लक्ष केले असल्याचेही आमदार रईस शेख यांनी यावेळी सांगितले