सदानंद नाईक
उल्हासनगर : महापालिका विशेष समिती मध्ये भाजपचे स्पष्ट बहुमत असतांना पराभवाच्या भीतीने भाजपने सत्ताधारी पक्षाशी हातमिळवणी केल्याची चर्चा शहरात रंगली. ९ पैकी ७ समिती सभापती पदासाठी एकमेव अर्ज आल्याने, त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा बाकी आहे. तर दोन समिती सभापती पदासाठी शिवसेना विरुद्ध भाजपचे उमेदवार उभे ठाकले आहे.
उल्हासनगर महापालिकेच्या एकून ९ विशेष समिती सभापती पदासाठी अर्ज दाखल करण्याची गुरवारची तारीख होती. विशेष समिती मध्ये ९ पैकी ५ सदस्य भाजपचे असून त्यांचे समितीत स्पष्ट बहुमत आहे. मात्र भाजपातील ओमी टीम समर्थक नगरसेवक सत्ताधारी शिवसेना आघाडी सोबत असल्याने भाजपची कोंडी झाली. समिती निवडणुकीत पराभवाच्या भीतीने भाजपने थेट शिवसेना आघाडी सोबत हातमिळवणी करून आरोग्य समिती व महिला व बालकल्याण अश्या दोन समित्या पदरात पाडून घेतल्याची टीका होत आहे. सार्वजनिक बांधकाम समिती, नियोजन विकास समिती, महसूल समिती अश्या ३ समित्या ओमी टीम समर्थक नागरसेवकांना, शिक्षण समिती शिवसेनेला तर गलिच्छ वस्ती निर्मूलन समिती रिपाइं गटातील पीआरपी पक्षाला गेली आहे. क्रीडा व समाजकल्याण समिती व पाणी पुरवठा समिती सभापती पदासाठी शिवसेना व भाजपने परस्पर विरोधात अर्ज दाखल केल्याने, ९ मार्च रोजी निवडणूक होणार आहे.
महापालिकेत भाजपचे स्पष्ट बहुमत असतांना भाजपातील बंडखोर ओमी टीम समर्थक नगरसेवकांच्या मदतीने शिवसेना आघाडीने, यापूर्वीच भाजपला चितपट करीत महापौर, उपमहापौर पदासह स्थायी समिती सभापती व विशेष समिती सभापती पद हिसकावून घेतले. तसेच विशेष समिती सभापतींच्या निवडणुकीत बहुमत असताना भाजपने माघार घेऊन २ समित्या पदरात पाडून घेतल्या. महापालिका सार्वत्रिक निवडणूक एका वर्षावर येऊन ठेपली असून बहुमत असतांना भाजपचा एकापाठोपाठ पराभव होत आहे. भाजपाचे शहरजिल्हाध्यक्ष जमनुदास पुरस्वानी यांनी सर्वच समिती सभापती पदासाठी पक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे आदी सांगितले होते. प्रत्यक्षात भाजपने दोन समिती सभापती पदासाठी शिवसेना आघाडी समोर लोटांगण घेतल्याची टीका होत आहे. शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सभापती पदाची निवडणूक होऊ नये म्हणून भाजपला दोन समित्या सोडल्याची प्रतिक्रिया दिली.
भाजप शहराध्यक्ष पुरस्वानीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्हे
महापालिकेसह विशेष समिती मध्ये स्पष्ट बहुमत असतांना, विशेष समिती सभापती पदाच्या निवडणूकित माघार का? असा प्रश्न पक्षातून विचारला जात आहे. पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी जमनुदास पुरस्वानी यांची निवड झाल्यानंतर, पक्षाचे महापालिकेत बहुमत असतांना पराभवाचे धक्के एकापाठोपाठ बसत आहे. आतातर विशेष समिती मध्ये बहुमत असतांना पक्षाने, थेट सत्ताधाऱ्यासमोर लोटांगण घालत पराभवाच्या भीतीने दोन समित्या पदरात पाडून घेतल्याचा आरोप होत आहे. एकुणच पुरस्वानी हटाव पक्ष बचाव असा नारा लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे.