भिवंडी- भिवंडीत पाच टोल नाके असून शहराच्या लगत सर्वच रस्ते बीओटी तत्त्वावर देण्यात आलेले आहेत मात्र या सर्वच टोल रस्त्याची सध्या दुरवस्था झाली आहे. भिवंडीतील कशेळी अंजुरफाटा वडपा रस्त्यावर प्रचंड खड्डे पडल्याने या रस्त्याच्या दुरावस्थेकडे शासनाचे लक्ष जावे व रस्त्याची डागडुजी लवकरात लवकर व्हावी यासाठी कशेळी टोल नाक्यावर भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्रीधर पाटील यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील यांनी देखील हजेरी लावली होती.
यावेळी सत्तेत असलेल्या तत्कालीन बांधकाम मंत्री यांच्या निकटवर्तीयांनी भिवंडीतील बीओटी रस्त्यांची कामे घेतली असल्यामुळेच ही कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची झाली असून सध्या या रस्त्यांची दुरावस्था झाली असल्याचा आरोप करत केंद्रीय मंत्री पाटील यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे.
ठाणे भिवंडी वडपे या बीओटीच्या माध्यमातून विकसित केलेल्या राज्यमार्गावरील खड्डे हे मरणयातना भोगायला लावणारे असल्याचे वक्तव्य देखील यावेळी मंत्री पाटील यांनी केले. या रास्तारोको आंदोलनप्रसंगी माजी आमदार योगेश पाटील,जिल्हा परिषद सदस्य जयवंत पाटील, सपना भोईर, पं स सदस्य महेंद्र पाटील, जितेंद्र डाकी, ललिता पाटील, काल्हेर ग्रामपंचायत सरपंच स्नेहा पाटील व ग्रा पं सदस्य, भाजपा तालुकाध्यक्ष पी के म्हात्रे, छत्रपती पाटील, युवा मोर्चाचे पप्पू खंडागळे यांसह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
रस्ते सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी राज्य शासनाची असताना ते झोपेचे सोंग घेत असून महाविकास आघाडी सरकार संवेदनाहीन सरकार असल्याची टिका देखील यावेळी पाटील यांनी केली असून . यापुढे जनतेला वेढीस धरण्याचे काम सरकारने करू नये नाही तर पुन्हा पुन्हा रस्त्यावर उतरून सरकारला स्वस्थ बसू देणार नाही असा इशारा देखील शेवटी कपिल पाटील यांनी दिला.
या आंदोलना नंतर मंत्री पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्व कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून रस्ता रोको आंदोलन केले ज्यामध्ये सुमारे अर्धा तास या मार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाल्यानंतर नारपोली पोलिसांनी आंदोलनाचे आयोजक श्रीधर पाटील, छत्रपती पाटील यांसह काही प्रमुख कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन या मार्गा वरील वाहतूक सुरळीत केली.