मीरारोड - मीरा भाईंदर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष मोहन पाटील हे भाजपाला रामराम ठोकुन पुन्हा स्वगृही परतले आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थित त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.मीरा भाईंदरच्या राजकारणात मोहन पाटील यांनी नगरसेवक, सभापती अशा अनेक पदांवर काम केले आहे. माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा यांचे ते एकेकाळचे कट्टर समर्थक मानले जायचे. नंतर त्यांनी माजी मंत्री गणेश नाईक व तत्कालिन खासदार संजीव नाईक यांच्याशी देखील जुळवुन घेतले. २०१७ सालच्या महापालिका निवडणुकी आधी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष असलेले पाटील यांनी आपल्या समर्थक पदाधिकारायांसह भाजपात प्रवेश केला होता. भाजपाचे तत्कालिन आमदार नरेंद्र मेहतांनी त्यांना सुरवातीला सोबत घेतले. पाटील यांच्या भावजय डॉ. प्रिती देखील प्रभाग १२ मधुन भाजपाच्या नगरसेविका म्हणुन निवडुन आल्या आहेत.पाटील यांना मेहता हे आपले राजकिय गुरु मानत आले आहेत. परंतु पाटील व मेहतां मध्ये काही गोष्टींवरुन मतभेद झाल्याने पाटील हे अलिप्त होते. त्यातच आगरी समाजाच्या अभिवन शिक्षण संस्थेतील अंतर्गत वादातुन पाटील सह अनेक पदाधिकारायांवर गुन्हा दाखल झाला. सद्या अभिनवचा वाद चिघळलेला आहे.दरम्यान गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची पाटील यांनी आज भेट घेतली. या भेटीवेळी शहराच्या राजकारणावर चर्चा होऊन पाटील यांनी पुन्हा स्वगृही परतण्याचा निर्णय झाला. आव्हाड यांनी पाटील यांचे पक्षात स्वागत केले. त्यांच्या आधी माजी उपनगराध्यक्ष अरुण कदम यांनी देखील शिवसेना सोडुन आव्हाड यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. कदम देखील मुळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत.
भाजपात गेलेले राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष पुन्हा स्वगृही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 7:22 PM