ठळक मुद्देमेहतांनी आज सोमवारी सायंकाळी आपल्या फेसबुकवर व्हिडिओ आणि पोस्ट टाकून भाजपासह राजकारणाला सोडचिठ्ठी देत असल्याचे जाहीर केल्याने त्यांच्या समर्थकांसह विरोधकांना देखील आश्चर्याचा मोठा धक्का बसला माझ्यामुळे पक्षाचे नुकसान होत असून, भाजपा नेत्यांना लाज वाटेल, असे काही होऊ नये म्हणून हा निर्णय घेतल्याचे मेहतांनी म्हटले आहे.मेहतांच्या वक्तव्यातून पक्षाचे त्यांच्यामुळे नुकसान होत असल्याचे तसेच नेत्यांना लाज वाटेल, असे सहन होणार नाही. म्हणून भाजपा व राजकारण सोडत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मीरा रोड - मीरा-भाईंदर भाजपाचे सर्वेसर्वा तथा वादग्रस्त माजी आमदार नरेंद्र मेहतांनी आज सोमवारी सायंकाळी आपल्या फेसबुकवर व्हिडिओ आणि पोस्ट टाकून भाजपासह राजकारणाला सोडचिठ्ठी देत असल्याचे जाहीर केल्याने त्यांच्या समर्थकांसह विरोधकांना देखील आश्चर्याचा मोठा धक्का बसला आहे. माझ्यामुळे पक्षाचे नुकसान होत असून, भाजपा नेत्यांना लाज वाटेल, असे काही होऊ नये म्हणून हा निर्णय घेतल्याचे मेहतांनी म्हटले आहे. मेहतांच्या वक्तव्यातून पक्षाचे त्यांच्यामुळे नुकसान होत असल्याचे तसेच नेत्यांना लाज वाटेल, असे सहन होणार नाही. म्हणून भाजपा व राजकारण सोडत असल्याचे स्पष्ट झाले आहे.आज सोमवारी सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास मेहतांनी त्यांच्या फेसबुक वॉलवर भाजपा व राजकारण सोडत असल्याची पोस्ट टाकली. नंतर एका तासाने त्यांनी स्वत:चा व्हिडीओसुद्धा पोस्ट केला. मी गेल्या ११ वर्षांपासून भाजपात काम करत आहे. अनेक चढ-उतार आले. सुखाचे व दु:खाचे क्षण आले. संघर्ष आले. कार्यकर्ता, जनता, नगरसेवकांनी साथ दिली. पण आज अशा वळणावर उभा आहे की, माझ्यामुळे भाजपाचे नुकसान होत आहे. माझ्या कृती, पद्धतीमुळे वा माझ्या आचरणामुळे पक्षाचे नुकसान होत आहे. माझ्यामुळे पक्षाच्या नेत्यांना लाज वाटेल, नमावे लागेल हे मी सहन करू शकत नाही. त्यामुळे मी भाजपाच्या सर्व पदांचा राजीनामा देतोय. मी भाजपाचा सच्चा कार्यकर्ता असल्याने अन्य पक्षात जाणारा नाही व राजकारण देखील करणार नाही.काही लोकांना यात देखील राजकारण वाटेल. काहींना मस्करी वाटेल. तर काहींना महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक कारण वाटेल. पण तसे काही नसले तरी काही कारण आहे, असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे. सर्वांची मनापासून माफी मागतो. विशेष करुन सर्वच राजकिय पक्षांची पण माफी मागतो. कारण या समाजसेवेच्या मार्गावर अनेक असे काही करावे लागले ज्याने ते दुखावले असतील. मला विश्वास आहे की, माझ्या चुका झाल्या असतील तर तुम्ही मला माफ कराल. माझ्या नशिबात राजकारण इथपर्यंतच होते आणि ही योग्य वेळ पण आहे. सर्वांचे आभार मानतो की इथपर्यंत साथ दिलीत. पक्षाच्या नेत्यांचे आभार मानतो. माझ्यामुळे पक्षाला खूप काही नुकसान सहन करावे लागले. पण हे कोणाचा दबावामुळे वा राजकीय दबावमुळे नाही तर मनापासून करतोय, असे मेहतांनी व्हिडिओत म्हटले आहे.वाद आणि क्लिपनंतर घडले राजीनामानाट्यभाजपा नगरसेविका नीला सोन्स यांनी महापौरपदासाठी दावेदारी केली होती. त्यांनी त्यासाठी जोरदार प्रयत्न चालवले होते. पण नीला यांना उमेदवारी देण्यात आली नाही. सायंकाळी त्या महापालिकेत विरोधी पक्षनेत्याच्या दालनात आल्या होत्या. त्या ठिकाणी त्यांची फोनवरुन कोणाशी तरी महापौरपदावरून खडाजंगी झाली. नंतर त्यांनी भाजपा नेते तथा माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांना एक व्हिडिओ क्लीप पाठवली. त्या नंतर अवघ्या तासाभरात मेहतांनी फेसबुक वर भाजपा व राजकारण सोडल्याचे जाहीर केले. याबाबत चव्हाण यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन घेतला नाही.मेहतांचा राजकीय प्रवासमीरा भाईंदर महापालिकेत ऑगस्ट २००२ साली नरेंद्र मेहता पहिल्यांदा निवडून आले. डिसेंबर २००२ मध्ये त्यांना अनधिकृत बांधकामाप्रकरणी लाच घेताना पकडण्यात आले. काँग्रेसने अधिकृत उमेदवार शानू गोहिल यांना पाडून अपक्ष असलेल्या मेहतांना प्रभाग समिती सभापतीपदी निवडून दिले. २००७ मध्ये अवघे दोन नगरसेवक असताना मेहतांनी राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपा, बविआ, बसपा व जनता दल (से) ला एकत्र आणून महापौरपद मिळवले. त्यावेळी काँग्रेसच्या चंद्रकांत वैतींना पराभूत केले होते. पुढे ज्या गिल्बर्ट मेंडोन्सांमुळे मेहता महापौर झाले त्याच मेंडोन्सांविरोधात मेहतांनी २००९ साली भाजपातून उमेदवारी मिळवत विधानसभा निवडणूक लढवली. पण मेंडोन्सांनी मेहतांचा पराभव केला. परंतु २०१४ च्या मोदी लाटेत मात्र मेंडोन्सा यांचा पराभव करून मेहता आमदार झाले. २०१५ साली शिवसेना, बविआला सोबत घेऊन पालिकेत पहिल्यांदा भाजपाची सत्ता आणली. गीता जैन महापौर झाल्या. २०१७ साली पालिकेत भाजपाची एकहाती सत्ता आली. आमदार झाल्यापासून मेहतांनी पालिका आणि पक्षावर पूर्णपणे आपली पकड बसवली. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तर मेहता अगदी खास आमदार मानले जायचे. फडणवीस स्वत: शहरात अनेकवेळा मेहतांच्या बोलावण्यावरून आले.परंतु मेहतांनी आमदार झाल्यावर व एकहाती सत्ता आल्यावर मनमर्जीचा कारभार सुरू केला. महापालिका प्रशासनासह पोलीस, महसूल आदी मेहतांच्या तालावर नाचू लागले. मेहता सांगेल तशी कारवाई व निर्णय होऊ लागले. अनेक वादग्रस्त निर्णय व कामकाज झाले. मनाला येईल त्याची बांधकामे तुटू लागली तर अनेकांची वाचवली जाऊ लागली. त्यामुळे मेहता नेहमीच आरोप आणि टीकेचे धनी ठरले. अल्पावधीतच ते शहरात राजकिय व्हिलन ठरले. त्यांच्या विरोधात २० च्या घरात दाखल गुन्हे, अनेक तक्रारी व दावे या मुळे ते सतत वादग्रस्तच राहिले. भ्रष्टाचाराचे, गैरप्रकाराचे, मनमानीचे त्यांच्यावर आरोप झाले. लोकायुक्तांनी संपत्ती प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून खुली चौकशी सुरू केली. त्यांचे अनेक प्रकल्प वादात आहेत. यातूनच २०१९ सालच्या निवडणुकीत मेहतांचा जनतेने पराभव केला आणि गीता जैन यांना आमदार म्हणून निवडून दिले. पण पराभवानंतर देखील मेहतांनी पक्ष व महापालिकेवर आपली पकड कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. गीता यांना पक्ष निर्णयात सतत डावलण्यात ते यशस्वी देखील ठरले.