लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : जनसंघाच्या स्थापनेपासून दोनदा खासदार राहिलेले स्व. रामभाऊ म्हाळगी यांनी पक्षाची अत्यंत खडतर काळात उभारणी केली. त्यांच्या योगदानामुळे आज भाजप दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाखाली चांगली सत्ता चालवत आहे. त्यामुळे अनेकांना विविध संधी मिळत आहेत. नेते मंडळींनी त्यांना पद मिळाले की सामान्यांची उपेक्षा करू नये. सामान्यांची जाण ठेवणारा भाजप हा सध्या एकमेव पक्ष आहे. त्यामुळे पक्ष बळकटीचा संकल्प कार्यकर्त्यांनी रामभाऊंच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त करावा, असे आवाहन पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार डॉ. अशोक मोडक यांनी केले.
माजी मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील यांच्या आयोजनाखाली म्हाळगी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शुक्रवारी प्रगती महाविद्यालयात हे व्याख्यान झाले. या कार्यक्रमाला पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आमदार रवींद्र चव्हाण हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी मोडक यांनी रामभाऊंचा जीवनपट उलगडवून सांगताना अनेक आठवणींना उजाळा दिला. नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर आयारामांना मंत्रिपदे मिळाल्याची व निष्ठावंतांना डावलल्याची चर्चा सुरू असताना डॉ. मोडक यांनी अन्य पक्षातून आलेल्यांना रामभाऊ म्हाळगी यांचा त्याग व त्या पुण्याईवर उभे असलेल्या केंद्रातील भाजप सरकारची सूचक आठवण करून दिल्याचे बोलले जात आहे.
चव्हाण म्हणाले, उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतून कार्यकर्त्यांना उत्तम प्रशिक्षण दिले जाते. ठाण्यात ४० वर्षे होणाऱ्या रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेत देशभरातील दिग्गज आपले विचार मांडतात. म्हाळगी यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांच्यातील गुण आत्मसात करण्याची आणि जनसेवेसाठी वाहून घेण्याची संधी आपल्याला आहे. त्या संधीतून प्रत्येकाने स्वतःला प्रगल्भ बनवले पाहिजे.
यावेळी जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनीही मनोगत व्यक्त केले. युवा मोर्चा अध्यक्ष मिहीर देसाई यांनी सूत्रसंचलन केले. त्यावेळी रा. स्व. संघाचे मधुकर चक्रदेव, ज्येष्ठ पत्रकार सुधीर जोगळेकर आदी उपस्थित होते.
चौकट :
म्हाळगी यांनी खेडोपाडी जाऊन जनसंघ उभा केला
पाटील म्हणाले, मी रामभाऊंच्या सोबत साडेचार वर्षे होते. ते ठाण्याचे खासदार होते. त्यावेळचा मतदारसंघ त्यांनी प्रवास करून पिंजून काढला, तेव्हाच्या काळात प्रवासाची तसेच संभाषणाची साधन नसताना त्यांनी खेडोपाडी जाऊन जनसंघ उभा केला. त्यांचे जीवन अभ्यास करण्यासारखे आहे. कार्यकर्त्यांना निश्चित प्रेरणा देणारे आहे.
---------
वाचली