ठाणे : शिवसेनेने ठाणे, कल्याण, डोंबिवली या शहरी भागांचा ज्याप्रमाणे विकास केला, त्याचप्रमाणे ग्रामीण भागांचाही विकास करील, हा विश्वास तेथील जनतेला वाटल्याने जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीत शिवसेनेला घवघवीत यश लाभले, असे उद्गार ठाण्याचे पालकमंत्री व शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख एकनाथ शिंदे यांनी ‘लोकमत’कडे काढले. इतर पक्षांचे नेते केवळ निवडणुकांपुरते लोकांना दिसतात. शिवसेना हा एकमेव पक्ष लोकांच्या सुखदु:खाशी निगडित असून लोकांच्या अडीअडचणीला धावून जाणारा पक्ष असल्याचा टोलाही त्यांनी भाजपाचा नामोल्लेख न करता लगावला.ठाणे पालिका आणि पाठोपाठ ठाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेने एकहाती विजय संपादन केला. त्या पार्श्वभूमीवर शिंदे बोलत होते. ठाणे महापालिकेत आणि आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत यश मिळाले. दोन्ही ठिकाणी भाजपाशी संघर्ष करावा लागला. भाजपाला तुम्ही काय इशारा देऊ इच्छिता, असा सवाल केला असता शिंदे म्हणाले की, कोणाला इशारा देण्यासाठी ही निवडणूक आम्ही लढवली नाही. शहरी भागांप्रमाणेच ग्रामीण भागांचाही शिवसेना विकास करेल, असा विश्वास लोकांनी शिवसेनेवर दाखवला आहे. त्या विश्वासाला शिवसेना पात्र ठरेल. शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जो विश्वास लोकांनी दाखवला, तो सार्थ करून दाखवणार.देशभर भाजपाची घोडदौड सुरू असताना ठाणे जिल्ह्यात शिवसेनेला मिळालेल्या यशाचे रहस्य काय, असे विचारले असता शिंदे म्हणाले की, शिवसेना जे बोलते ते करून दाखवते. ठाणे जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. आनंद दिघेसाहेबांनी ठाण्याच्या कानाकोपºयांत खूप काम केले आहे. शिवसेनाप्रमुखांवर इथल्या जनतेने प्रेम केले आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ या शहरांत चांगली कामे केली. शिवसेना वचननाम्यात दिलेल्या आश्वासनांप्रमाणे कामे करत असते. निवडणुकीनंतरही उद्धव आणि आदित्य ठाकरे सातत्याने पाठपुरावा करत असतात. हे ठाणे जिल्ह्यातील लोकांना माहीत आहे. इतर पक्षांचे नेते निवडणुकीपुरते लोकांसमोर येतात. पण, शिवसेना सतत लोकांसोबत आहे. भाजपाला रोखण्यासाठी यापुढे शिवसेनेने राष्टÑवादी, मनसे अशा पक्षांना सोबत घेणे गरजेचे वाटते का, असे विचारले असता शिंदे म्हणाले की, आम्हाला कोणाला रोखण्याचे काम करायचे नाही. विकासाचे मुद्दे घेऊन निवडणूक लढवायची आहे.शिवसेनेच्या स्थापनेपासून ठाणे महापालिकेत कधीही शिवसेनेला बहुमत मिळाले नाही, ते तुमच्या कार्यकाळात मिळाले. जिल्हा परिषदेतही एकहाती सत्ता आली. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना नेतृत्वाकडून काय अपेक्षा आहेत? मध्यंतरी, तुम्ही उपमुख्यमंत्री होणार, अशीही चर्चा होती... या प्रश्नावर शिंदे म्हणाले की, उपमुख्यमंत्री वगैरे काही नाही. कोणाची नियुक्ती करायची, याचा सर्वस्वी अधिकार पक्षप्रमुख म्हणून उद्धव यांचा आहे. मी फक्त त्यांच्या आदेशाचे पालन करणारा सामान्य कार्यकर्ता आहे.
भाजपाचे नेते फक्त निवडणुकीत, एकनाथ शिंदे यांचा टोला, उद्धव ठाकरे देतील ती जबाबदारी घेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 4:25 AM