... अन् अजितदादा शिवसेनेच्या मदतीला धावले, भाजपची हवाच काढली!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2022 08:37 AM2022-03-19T08:37:02+5:302022-03-19T08:37:14+5:30
काश्मिर फाईल करमुक्त करण्याची मागणी मान्य ही करता येत नाही आणि धुडकाऊनही लावता येत नाही, अशी शिवसेनेची अवस्था.
काश्मिर फाईल हा सिनेमा करमुक्त करण्याची मागणी करत भाजपने मोठा गदारोळ केला. विधिमंडळातही हा मुद्दा भाजप आमदारांनी रेटला. काश्मिरच्या आडून शिवसेनेचे हिंदुत्व पातळं झाल्याचा माहोल तयार करण्याचा हा प्रयत्न आहे. हिंदुत्वाच्या विविध मुद्दयांवर सध्या शिवसेनेला कुचंबणा सहन करावी लागत आहे. सुरूवातीच्या काळात आम्ही कडवट हा राग आवळून झाला. पण, आताची ही कडवट मात्र फारशी कामी येईनाशी झाली आहे.
काश्मिर फाईल करमुक्त करण्याची मागणी मान्य ही करता येत नाही आणि धुडकाऊनही लावता येत नाही, अशी शिवसेनेची अवस्था. मात्र, यावेळी अजित पवार यांनी शिवसेनेची ही कोंडी फोडली. खाते त्यांचेच असल्याने या मागणीवर उत्तर देताना रोखठोक अजित पवार यांनी भाजपची चांगलीच फिरकी घेतली. जीएसटीमध्ये राज्याचा व केंद्राचा निम्मा हिस्सा असतो. महाराष्ट्राने करमाफी दिली तरी ती निम्मीच असणार. त्यामुळे केंद्राने करमाफी दिली तर कन्याकुमारी ते श्रीनगर सगळ्यांना सिनेमा पाहता येईल. त्यामुळे भाजप नेत्यांनी केंद्रात मोदी साहेबांकडे जोर लावावा, म्हणत भाजपची हवाच काढली.
ठाण्यात धुळवडीचा राजकीय रंग वेगळा
ठाण्याच्या टेंभीनाक्यावर स्व. आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या धुळवडीच्या उत्सवात दरवर्षी सर्वपक्षीय कार्यकर्ते सहभागी होतात. यामुळे येथील धुळवडीला शहरात वेगळे राजकीय वलय आहे. मात्र. कोरोनाच्या सावटाखाली यंदा दोन वर्षांनंतर साजरा होणार्या येथील धुळवडी उत्सवात तो सर्वपक्षीय आनंद दिसला नाही. ठाण्यात गेल्या काही दिवसांपासून शिवसेना-राष्ट्रवादीतील वादाचे सावट या या उत्सवावर दिसले. यंदा या उत्सवात फक्त आणि फक्त शिवसैनिकच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत नाचतांना, रंग उधळतांना दिसले. नेहमी दिसणारे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि नेते या धुळवडीकडे फिरकले नाही. मात्र, त्यांनी आपले नेते गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत धुळवडीचा आनंद लुटताना केंद्रीय यंत्रणांविरोधात शिमगा केला.