महापौरांनी टोचले भाजपचे कान
जवळजवळ दोन तास या विषयावर चर्चा सुरू असताना महापौर नरेश म्हस्के यांनी भाजप नगरसेवकांचे कान टोचले. सभागृहात एक भूमिका आणि बाहेर दुसरी, हे भाजप नगरसेवकांचे वागणे अयोग्य आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनातही संभ्रमावस्था निर्माण होते. आधी पार्किंग प्लाझा का सुरू केले, त्यावर का खर्च केला गेला, यावरून आक्षेप घेतला गेला. नंतर व्होल्टास आणि बुश कंपनीत सुरू करण्यात येत असलेल्या कोविड सेंटरच्या खर्चावरून आक्षेप घेतला. ग्लोबलमध्ये सध्या रुग्ण कमी आहेत, त्यानुसारच ठेकेदाराला बिल अदा केले जात आहे. केवळ ग्लोबलमधीलच नाही तर कोरोनाकाळात इतर विभागातही कंत्राटी कर्मचारी घेतले गेले आहेत, त्यांचा विचार का केला जात नाही, असा सवालही त्यांनी भाजपला केला. सध्या कोरोनामुळे निधीची कमतरता आहे. त्यामुळे सध्या कर्मचारी कमी करून निधीची बचत होणार आहे. त्यातून इतर कामांसाठी निधी मिळणार आहे. त्यातच ठेकेदाराला काम करणे परवडत नसल्याने त्यानेदेखील येथून जाण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे भाजपने आता ठेकेदार आणावा, अशी टीकाही त्यांनी केली.