ठाणे : ग्लोबल रुग्णालयातील डॉक्टर, नर्सेस आणि इतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले असताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी त्यांची भेट घेतल्याचा मुद्दा बुधवारी महासभेत चांगलाच गाजला. महासभेत भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगला. महासभेत एक भूमिका आणि बाहेर दुसरी अशी भाजपची दुटप्पी भूमिका असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी भाजपवर केला. परंतु, आम्ही दुटप्पी भूमिका घेतलीच नसल्याचे भाजपच्या नगरसेवकांनी ठासून सांगितले. यातून महासभेचे वातावरण चांगलेच तापले. प्रसिद्धीसाठी किंवा स्वत:चे अथवा पक्षाचे नाव मोठे करण्यासाठी असे प्रकार करणे अयोग्य असल्याची टीका महापौर नरेश म्हस्के यांनी या वेळी भाजपवर केली.
ग्लोबल रुग्णालयातील आंदोलनकर्त्यांची प्रवीण दरेकर यांनी बुधवारी भेट घेतली. याच मुद्द्यावरून महासभेत महाविकास आघाडीचे नगरसेवक भाजपवर घसरले. राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी दरेकर हे कशासाठी आले होते, असा सवाल केला. त्यावर पालिकेने ते ग्लोबल रुग्णालयातील आंदोलकांची भेट घेण्यासाठी आले असल्याचे सांगितले. रुग्ण कमी असताना जास्तीचे कर्मचारी कशासाठी ठेवावेत, असा सवालही त्यांनी केला. त्यातही मंगळवारी महासभेत याच विषयाला भाजपनेदेखील पाठिंबा दिला होता. पण, पक्षाचे नेते आल्यावर त्यांना चुकीची माहिती द्यायची, हे भाजपचे दुटप्पी वागणे असल्याचा आरोप त्यांनी केला. आम्ही दुटप्पी भूमिका घेतली नसल्याचे भाजपचे गटनेते मनोहर डुंबरे यांनी स्पष्ट केले. केवळ अनावश्यक खर्च टाळला पाहिजे, असे मत आम्ही मांडले होते. अत्यावश्यक कामासाठी केलेल्या खर्चाबाबत आम्ही केव्हाही विरोध केला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मिलिंद पाटणकर यांनी आम्ही जे बोललो होतो, त्याचा विपर्यास करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगितले. पालकमंत्री जरी कुठे गेले तर ती बातमी होत नाही का, असा सवालही त्यांनी केला. कर्मचारी वर्ग कमी केला असताना पालिकेकडून ठेकेदाराला पूर्ण बिल अदा केले जात आहे. परंतु ठेकेदाराकडून कर्मचाऱ्यांना अर्धाच पगार दिला जात असल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला. एकूणच भाजप या वेळी महासभेत आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न करताना दिसून आला.