ठाणे : एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत असलेल्या शिस्त आणि आवेदन पध्दतीमध्ये असलेल्या जाचक अटी शिथील कराव्यात, राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता ३८ टक्के मिळतो. एसटी कर्मचाऱ्यांना ३४ टक्के मिळतो, त्यानुसार राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे माहागाई भत्ता राज्य सरकाराने जाहीर करावा, एसटी कर्मचाऱ्यांचे पाच ते सहा महिने आंदोलन झाले होते. त्यामुळे या काळातील अनुपस्थितीचा कालावधी नियमित करावा अशा मागण्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आल्या असल्याची माहिती भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली. मुख्यमंत्री शिंदे यांनी देखील याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
शनिवारी सकाळी पडळकर यांनी शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलतांना त्यांनी ही माहिती दिली. या बैठकीत एसटी महामंडळाच्या एमडीला मुख्यमंत्र्यांनी योग्य सूचना दिल्या असून काही दिवसात परिपत्रक रद्द करून मागण्या पूर्ण होणार असल्याचे पडळकर यांनी सांगितले.
पंकजा मुंडे या भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आहेत त्याचे राज्यभर मोठं काम आहे स्वर्गीय गोपीनाथ राव मुंडे यांना अभिवादन करण्यासाठी सर्व राजकीय नेते व लाखो सहकारी येतात, मुंडे यांचे अनेक सहकारी इतर पक्षात आहेत, ते सुध्दा अभिवादन करण्यासाठी येत असतात. त्यामुळे या विषयाकडे राजकीय दृष्टीने पाहू नये असेही त्यांनी सांगितले. तसेच इतर पक्षाची लोकांनी काही चुकीचे स्टेटमेंट करु नये, त्या सगळ्यांना विनंती आहे की पंकजा मुंडे यांच्या बाबतीत चुकीचा संभ्रम निर्माण करण्याचे काम करु नये.
महाविकास आघाडीला राज्याच्या लोकांचे काही देणे घेणे नाही ते राज्यातल्या कुठल्या प्रश्नावर ते बोलत नाही, राज्यातील सत्ता गेल्याने यांना फक्त बैफल्यग्रस्त झालेले आहे. त्यामुळे ते एकमेकांवर टिका करीत असतात, त्यामुळे लोकांनी या महाविकास आघाडीकडे बघायचे, ऐकायचं सुद्धा लोकांनी नाकारलेला आहे. संजय राऊत काय बोलले अजित पवार काय बोलले काँग्रेसचे नेते काय बोलले याकडे लोक जास्त सिरियसली बघत नसल्याचेही त्यांनी सांगितले.