कल्याण : कल्याण पूर्व मतदारसंघातील लसीकरण केंद्रावर नागरिकांना लस देताना भेदभाव केला जात आहे. लसीकरणासाठी आलेल्यांना भरउन्हात ताटकळत ठेवले जाते. हा प्रकार कळताच कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी लसीकरण केंद्रावर धाव घेऊन तेथील कर्मचाऱ्यांना फैलावर घेतले. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
उल्हास नगरातील कॅम्प नं. ४ मधील एका शाळेतील लसीकरण केंद्रावर नागरिकांनी रांग लावली होती. तेथे एकीकडे ४५ पेक्षा अधिक वयोगटांतील, तर दुसरीकडे १८ ते ४४ वयोगटांतील तरुण रांगेत उभे होते; मात्र नियोजनाअभावी ते उन्हात तिष्ठत असल्याची माहिती गायकवाड यांना एका नागरिकाने कळविताच ते तेथे पोहोचले. यावेळी तेथे कर्मचारी होते; मात्र डॉक्टर व परिचारिका पोहोचलेल्या नव्हत्या. त्यामुळे संतप्त झालेल्या गायकवाड यांनी कर्मचाऱ्यांना अपशब्द वापरले. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विरोधात नाराजी व्यक्त केली.
याबाबत गायकवाड म्हणाले की, एका बाजूला ऑनलाइन, तर दुसऱ्या बाजूला ऑफलाइन नागरिकांची रांग लसीकरणासाठी होती. तेथे ऑनलाइन नोंदणी केलेल्यांनाच लस दिली जाईल, असे सांगितले गेले. मग ऑफलाइन नागरिकांना का रांगेत उभे केले होते, असा सवाल डॉक्टर व कर्मचाऱ्यांना विचारला; मात्र त्यामागे त्यांचा अवमान करण्याचा उद्देश नव्हता. जे काही बोललो ते नागरिकांना लस मिळणे सुकर व्हावे, यासाठी बोललो आहे; परंतु त्याचा विपर्यास करत माझ्या काही विरोधकांनी हा व्हिडिओ व्हायरल केला आहे.
------------------