अजित मांडके, ठाणे : आयोध्येत प्रभु श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी आता भक्तगण आतुर झाले आहेत. परंतु सध्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी उपाय योजना सुरु असल्याने १० फेब्रुवारी पर्यंत त्यासाठी वेळ द्यावा असे सांगण्यात आले असताना ठाण्यातून भाजपच्या वतीने, ३१ जानेवारी रोजी विशेष ट्रेनचे आयोजन करण्यात आले आहे. आयोध्येला जा मोफत अशीच काहीसी ही सेवा असली तरी देखील मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न भाजपने या माध्यमातून केल्याची चर्चा सुरु झाली आहे.
अयोध्येत जाऊन प्रभू श्री रामाचे दर्शन कधी एकदा घेतो, असे सर्वसामान्य नागरिकांना झाले आहे. हीच नस पकडून भारतीय जनता पक्षाने आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मतदारांना अयोध्या वारीसह श्रीरामाचे दर्शनास नेण्याची तयार सुरू करत गोजरण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्यानुसार पहिली विशेष ट्रेन सोडण्याचे नियोजन केले असून अयोध्येस जाणाऱ्या नागरिकांनी आपली नोंद करण्याचे आवाहन भाजपने केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ जानेवारीला अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराचे मोठया धुमधडाक्यात उद्घाटन केले. त्या उद्घाटन सोहळ्यास सर्वसामान्यांना सहभागी होता आले नाही. त्यामुळे मयार्दा पुरुषोत्तम प्रभू रामाचे दर्शन घेता आले नाही. अयोध्येतील श्री राम दर्शनाची प्रत्येकाला ओढ लागलेली आहे. ही नस पकडून भाजपने आगामी निवडणुका डोळ्यासमोर मतांची पेरणी करण्यास सुरुवात केली आहे.
अयोध्येसाठी येत्या ३१ जानेवारीला पहिली विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहे. या ट्रेनने अयोध्येला जाण्याची इच्छा असलेल्या व्यक्तींच्या नावापासून आधारकार्ड आणि मोबाईल क्रमांक याची नोंद करण्याचे आवाहन करत ती नोंद केली जाणार आहे. हीच नोंद भविष्यात भाजपला निवडणुकीसाठी उपयोगी पडणार आहे. तसेच जसे ट्रेन नेली जाणार आहे तसे ट्रेनने परतीचा प्रवासही करण्याची व्यवस्थाही करून दिली आहे. ही एकच ट्रेन नसून अशाप्रकारे यापुढेही अयोध्येत विशेष ट्रेन भाजपमार्फत सोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.